खा. उदयनराजे वाई न्यायालयात हजर
प्रतिनिधी/ सातारा
आनेवाडी टोल नाका हस्तांतरण व ताबा प्रकरणाची सुनावणी वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर आज झाली. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद एकूण पुढील सुनावणी 7 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने मिलिंद पांडकर यांनी तर खा. उदयनराजे भोसले यांच्यावतीने ताहेर मणेर यांनी काम पाहिले.
उदयनराजे न्यायालयात उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता
भाजपाचे खा. उदयनराजे भोसले वाई न्यायालयात आज सुनावणीसाठी हजर झाले होते. आनेवाडी टोल नाका हस्तांतरण व ताबा प्रकरणात खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेल्या धुमश्चक्री प्रकरणी सुनावणीसाठी ते हजर झाले होते.
आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होते. हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते. टोलनाक्याच्या व्यवस्थापन हस्तांतरावरुन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये वाद होता. 6 ऑक्टोबर 2017 रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली.
जमावबंदीचा आदेश लागू असताना हा प्रकार घडला होता. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी उदयनराजे व अन्य पंधरा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
टोलनाक्यावर झालेल्या धुमश्चक्रीनंतर सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरासमोर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता. त्यावेळी अज्ञाताकडून गोळीबारही झाला होता. या प्रकरणामध्ये उदयनराजेंचे कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले होते, मात्र उदयनराजे हजर झाले नव्हते. उदयनराजेंना अनेक वेळा समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी उदयनराजे, अशोक सावंत, राजू गोडसे, बाळासाहेब ढेकणे, सनी भोसले, मुरलीधर भोसले, अजिंक्य भोसले, इम्तियाज बागवान, बंडा पैलवान, किरण कुहाडे आदी प्रमुख संशयितांसह स्वतः हून वाई न्यायालयात हजर झाले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद एकूण पुढील सुनावणी 7 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.