वार्ताहार/ आनेवाड़ी
प्रत्येक शनिवारी व रविवारी आनेवाडी (ता.जावली) टोलनाक्यावर वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे वाहन चालक व टोल कर्मचाऱयांमध्ये नाक्यावर वादावादी होत असते. मात्र रविवारी रात्री वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचा विडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्हाभर चर्चा सुरु आहे. त्यामुळे आनेवाडी टोल नाक्यावर काल रात्री काही तासासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते. याप्रकरणी विनायक नामदेव तनपुरे राहणार भोर, सीमा विनायक तनपुरे राहणार भोर, शुभम अंबर सावंत, सनी सावंत, निलेश सावंत सर्व राहणार लिंब (ता.सातारा), आकाश रोकडे मर्ढे अशा एकूण भुईंज पोलीस स्टेशनमध्ये एकूण सातजणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती भुईंज पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नेहमीच आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांची तुफान गर्दी असते. याचवेळी पुण्याच्या दिशेने जाणारी इरटीका गाडी चालक विनायक तनपुरे हे लेन 1 वरून जात असताना टोल कर्मचारी आकाश रोकडे याच्याशी वादावादी झाली त्यानंतर वाहन चालकाने गाडे थेट कर्मचाऱयांच्या अंगावर गाडी घातली असल्याची तक्रार केली. त्यानंतर गाडीतील महिला प्रवासी सीमा विनायक तनपुरे यांनी कर्मचाऱयांस हाणामारी करण्यास सुरुवात केली. महिला प्रवासाला उद्धट वर्तन केले हे कारण सांगून थेट या टोळक्याने दोन कर्मचाऱयाला तुफान हाणामारी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळ तणावाचे वातावरण होते.
दरम्यान मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परस्पर मिटलेले प्रकरण यामध्ये कोणीच फिर्याद देण्यासाठी समोर येत नसतानाच स्वतः घटनास्थळी उपस्थित गृहरक्षक सुरज नारायण पवार यांनी फिर्याद भुईंज पोलीस स्थानकांमध्ये दिली. परस्पर विरोधी सात जणांवर तक्रार दाखल झाली. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने हाणामारी करत वातावरण तंग करणे, कोरोनाच्या अनुषंगाने तोंडास मास्क न लावता, सामाजिक अंतर न पाहता, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल अशा रितीने आपआपसात शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. या प्रकरणी भुईंज पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास सपोनि आशीष कांबळे करत आहेत.
रविवारी रात्री आनेवाडी टोलनाक्यावर जोरदार हाणामारी झाल्याचा विडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला होता. आदी विविध प्रकरणांमुळे आनेवाडी टोलनाका नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे या अंदाधुंदी रोज होणाऱया हाणामाऱया व दमबाजीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी देखील वाहनचालकांकडून होऊ लागली आहे. सदर प्रकरणी सातजणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.