प्रतिनिधी /पणजी
विधानसभेच्या कुंभारजुवे मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार गोरखनाथ सुरेश केरकर यांनी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या कार्यकर्त्यांसह देवदेवतांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी गोरखनाथ केरकर यांनी श्री रवळनाथ देवस्थान धुळापी मानगादो, श्री सातेरी देवस्थान व श्री सासनेश्वर देवस्थानात जाऊन देवतांना श्रीफळ अर्पण केले आणि आपल्या विजयासाठी प्रार्थना केली. त्यानंतर गोरखनाथ केरकर यांनी जुने गोवे येथील दर्गा आणि सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च येथे जाऊन दर्शन घेतले.
केरकर यांचे काकार्यकर्ते सुभाष नाईक, दिनेश माशेलकर, नीता धुळापकर, सिद्देश शिरोडकर, सुरज आगरवाडेकर, शहनवाझ बस्सापूर, अनंत केरकर, भानुदास नाईक, नीलेश नाईक, आशिष नाईक, संजय चव्हाण, रामदास कट्टीकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना केरकर म्हणाले की गोवा राज्याचा ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता तो झालेला नाही. गोवेकरांनी कांग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांना सत्ता दिली परंतु त्यांची सत्ता लोकांच्या पसंतीस उतरलेली नाही. गोवा विकासापासून वंचित राहिलेला आहे. अशा वेळी आम आदमी पार्टी गोव्याचा सर्वांगीण विकास साधू शकते. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून दिल्ली राज्याचा सर्वांगीण विकास साधला आहे. तसाच विकास आम आदमी पार्टी गोव्यात साधणार आहे, असे ते म्हणाले.