आज विविध मतदारसंघांचा दौरा
प्रतिनिधी / पणजी
दिल्लीच्या आमदार तथा आम आदमी पार्टीच्या गोवा प्रभारी आतिशी या गुरुवारी गोव्यात दाखल झाल्या. निवडणुकीपूर्वी त्यांचा हा दुसरा गोवा दौरा असून आज शुक्रवारी त्या राज्यात विविध मतदारसंघांना भेटी देणार आहेत.
आज सकाळी सर्वप्रथम त्या कळंगुटमध्ये आप नेते सुदेश मयेकर यांच्यासोबत घरोघरी प्रचारात सहभाग घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पणजीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. सायंकाळी बाणावलीत घरोघरी प्रचारात उपाध्यक्ष वेंझी व्हिएगास यांच्यासोबत सहभागी होतील. त्यानंतर फातोर्डा येथील परिवर्तन यात्रेत उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई यांच्या सभेस उपस्थित राहतील.
काँग्रेसने गोव्यातील लोकांची मते भाजपला विकली. भाजपने ही मते विकत घेतली व एकत्रितपणे ’काँग्रेस जनता पार्टी’ स्थापन केली. गोमंतकीय लोक हा विश्वासघात विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल ’आप’ देणार आहे, असे पक्षाने पत्रकात नमूद केले आहे.