आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांचा दावा : गोवा मुख्यमंत्रीही बदलणार का? सवाल उपस्थित
प्रतिनिधी /पणजी
जनतेचा रोष वाढत असल्याचा सुगाव लागल्याने भाजप आपले अकार्यक्षम मुख्यमंत्री बदलू लागला आहेत. कर्नाटक, उत्तराखंड नंतर आता खुद्द पंतप्रधानांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री बदलावा लागत आहे. या मालिकेत पुढील क्रमांक गोवा मुख्यमंत्र्याचा लागणार आहे का? असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे.
बलाढय़ भाजपला लोक आता बॅकफूटवर पाहू लागले आहेत. आम आदमी पक्षाचा वाढता प्रभाव हेच यामागील महत्वाचे कारण आहे. त्यातून अनेक राज्यांत भाजपसाठी ’आप’ गंभीर आव्हान बनू लागला आहे. अलीकडेच आपने गुजरातच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केला. तेथे ’आप’च्या कोपरा सभांना भाजप व काँग्रेसच्या रॅलींपेक्षा जास्त उपस्थिती होती, यावरून सुरतच्या नागरिकांनी वरील दोन्ही पक्षांना पर्याय म्हणून आपची निवड केली आहे हेच सिद्ध होत आहे, असे आपने म्हटले आहे.
कमकुवत काँग्रेसची मिळमिळीत धोरणे
कमकुवत बनलेल्या काँग्रेसची मिळमिळीत धोरणे पाहता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पक्षाकडे पहिले जाऊ लागले आहे, अशी प्रतिक्रिया आपने दिली आहे. आप ने भाजपला ’एकतर काम करा किंवा राजीनामा द्या’ असे आव्हानही दिले आहे. आप’ हाताळत असलेल्या वेगवेगळय़ा विषयावरून सत्ताधारी भाजप हादरले असल्याचे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे.
आधारास धावला केवळ आप
गैरमार्गाने सत्ता काबीज केलेल्या भाजपला कंटाळलेले गोव्यातील लोक मोठय़ा संख्येने आम आदमी पक्षाकडे आकर्षित होत आहेत. खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभे आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात प्रत्येक गोमंतकीयास कुणाच्यातरी आधाराची, मदतीची अपेक्षा होती. त्यावेळी भाजप वा काँग्रेस पक्ष मदतीसाठी धावला नाही. केवळ आप त्यांच्या सोबत राहिला. आप ने त्यांना ऑक्सिमीटर, वैद्यकीय मदत तसेच मोफत रेशनच्या स्वरूपात मदत केली आहे, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.
आपच भाजपला धडा शिकवील : चड्डा
उत्तराखंड आणि गुजरातमध्ये आप चा दरारा वाढू लागला आहे. एक प्रभावी विरोध पक्ष म्हणजे काय हे जनतेला माहित आहे. त्यामुळे स्वतःची लाज वाचविण्यासाठी भाजपने आपला मुख्यमंत्री बदलला. दुसरीकडे काँग्रेस एक कमकुवत अपयशी विरोधी पक्ष असल्याने केवळ आपच भाजपला धडा शिकवेल याची खात्री लोक बाळगू लागले आहेत, असे आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी म्हटले आहे.