पंकज गुप्ता अन् एन.डी. गुप्तांना मिळाली जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा राष्ट्रीय संयोजकपदी निवडण्यात आले आहे. रविवारी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱयांनी केजरीवालांवर पुन्हा विश्वास दाखविला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंकज गुप्ता यांना सचिव तर एन.डी. गुप्ता यांना खजिनदारपदी नियुक्ती मिळाली आहे. एन.डी. गुप्ता हे दिल्लीमधून राज्यसभेवर गेले आहेत. तर पंकज गुप्ता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.
आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून केजरीवाल हेच राष्ट्रीय संयोजक आहेत. दिल्लीत सध्या कॅबिनेट मंत्री गोपाळ राय हे प्रदेश संयोजक आहेत. तत्पूवीं पक्षाची शनिवारी बैठक पार पडली होती, यात नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली होती. कार्यकारिणीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमवेत एकूण 34 नेत्यांना स्थान मिळाले आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱया राज्यांमधील नेत्यांचाही यात समावेश आहे.
तिकीट, पदाची इच्छा बाळगू नका
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना केजरीवालांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्यासाठी तिकीट तसेच पद मिळण्याची इच्छा बाळगू नका असे सांगितले होते. आमच्या पक्षाला भाजप आणि काँग्रेससारखा पक्ष म्हणून ओळखले जाऊ नये असे केजरीवालांनी म्हटले होते. आम आदमी पक्ष आता दिल्लीसह अन्य राज्यांमध्येही विस्तार करू पाहत आहे. ‘आप’ने पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि गुजरातवर लक्ष केंद्रीत केले आहे.