मान्सूनपूर्व आढावा बैठकीत प्रांताधिकाऱयांच्या सूचना : कार्यालयांमध्ये शंभर टक्के हजेरीचे आदेश
प्रतिनिधी / कणकवली:
पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सतर्क राहून आपत्कालीन स्थितीत तातडीने संपर्क साधणे, उपाययोजना करण्यासाठी तत्पर राहवे. कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीच्या सूचना असून कर्मचाऱयांनी मुख्यालयी राहायचे आहे. आपत्कालीनसाठी डय़ुटी लावण्यात आलेल्या कर्मचाऱयांनी डय़ुटीवर हजर राहायलाच हवे. डय़ुटीवरील कर्मचारी काही कारणाने उपस्थित राहू न शकल्यास त्या-त्या कार्यालयप्रमुखांनी पर्यायी व्यवस्था करायची आहे. तसे न झाल्यास सर्वस्वी जबाबदार त्या कार्यालयप्रमुखांना धरण्यात येईल, असे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी स्पष्ट केले.
येथील तहसील कार्यालयात श्रीमती राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी मनोज भोसले, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कुमावत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक प्रकाश भिसे, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, रा. प. महामंडळाचे नीलेश लाड, नगरपंचायतीचे अधीक्षक भाई साटम, पाणीपुरवठा विभागाच्या श्रीमती जठार, राष्ट्रीय महामार्गचे महाजन, पोलीस हवालदार अभिजीत तावडे, बावदणे, नगर पंचायतीचे सतीश कांबळे, बाबर, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, एकात्मिक बालविकास आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
धोकादायक शाळा दुरुस्तीचा आढावा
नगरपंचायतीच्या माध्यमातून गटार साफसफाई तसेच पाणी वाहून जाण्यास अडथळा होणार नाही, यादृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील धोकादायक शाळांच्या दुरुस्तीबाबतही आढावा घेण्यात आला. धोकादायक शाळांची अत्यावश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. वीज वितरणकडून पावसाळय़ापूर्वीची कामे गतीने पूर्ण करावीत. वादळी पावसात विद्युत लाईनवर झाडे पडल्याने तारा तुटणे, खांब मोडणे अशा घटना घडतात. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित राहतो. त्यासाठी धोकादायक फांद्या, झाडांची तातडीने छाटणी करण्याच्या सूचनाही प्रांताधिकारी सौ. राजमाने यांनी दिल्या. रा. प. महामंडळानेही पावसाळय़ातील बसेसच्या अनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभागाने आणलेल्या आराखडय़ाच्या अनुषंगाने माहिती घेत उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
महामार्गावर सूचना फलक लावा
तालुक्यात खारेपाटण व अन्य भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यास आवश्यक बोट व इतर साहित्य, पर्यायी व्यवस्था याबाबतही माहिती घेण्यात आली. फोंडाघाटमध्ये दरड कोसळल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करायच्या उपाययोजनांच्या अनुषंगानेही आढावा घेण्यात आला. महामार्गाचे काम सध्या सुरू असून पावसाळय़ापूर्वी पाण्यास अडथळा होणाऱया ठिकाणी उपाययोजना करा, आवश्यक ठिकाणी डायव्हर्शन व इतर बोर्ड लावा, जानवली, साकेडी अंडरपासच्या ठिकाणी तातडीने अत्यावश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.