मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची केजरीवाल यांच्यावर टीका
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पलटवार केला असून त्यांनी गोव्यातील जनतेला हवेतील स्वप्ने दाखवू नयेत. तसेच बेभरवशाची आश्वासने देऊ नयेत असे म्हटले आहे.
समाजकल्याण खात्याच्या पणजीतील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमधील कार्यक्रमात डॉ. सावंत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, सत्तेवर येण्यासाठी आपने चंद्र-सूर्य-तारे यांची आशा दाखवू नये. जे शक्य आहे, त्याचीच आश्वासने द्यावीत. अशी आश्वासने देवून कोण सत्ता मिळवू शकत नाही. खासगी क्षेत्रात आपने केजरीवाल यांनी गोमंतकीयांना नोकऱया देण्याची ग्वाही दिली. हेच काम आपल्या सरकारने याआधीच सुरू केले असून गोदरेज, ई-मर्क-सिप्ला व इतर अनेक खासगी कंपन्यातून नोकऱया देण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
आप जे काही सांगतो-करायला बघतो ते याआधी आपल्या सरकारने चालू केल्याचे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले. यापूर्वी खासगी क्षेत्रात 170 जणांना नोकऱया देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. प्रशिक्षणार्थी योजना देखील याआधीच सुरू करण्यात आली असून मॉडेल करिअर सेंटरही चालू झाल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये कुशल विकास योजना राबवण्यात आल्या आहेत आणि त्यातून गरजेचे मनुष्यबळ तयार होण्यास मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आप व केजरीवालांवर कडाडून टीका केली. असली फालतू आश्वासने देऊन कोण सत्तेवर येवू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक योजना कुशल मनुष्यबळासाठी राबवल्या जात असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.