भाजपने दिला जाहीर इशारा
प्रतिनिधी /मडगाव
भाजपने अद्याप आपल्या कंबरेचे सोडलेले नाही. भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. पण तशी वेळ आली तर आम आदमी पक्षाला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास भाजप मागे राहणार नसल्याचा इशारा काल सोमवारी भाजपने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. नुवेचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांना ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन केक देण्याचा प्रयत्न करणे व त्यानंतर सलग दोन दिवस जे काही केले, त्याचा निषेधही भाजपने या पत्रकार परिषदेतून केला.
प्रदेश भाजपचे दोन सचिव दामू नाईक व ऍड. नरेंद्र सावईकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याच बरोबर नुवेचे आमदार बाबाशान यांच्या मागे भाजप भक्कमपणे उभा असल्याचे स्पष्ट केले आहे. एका आमदाराच्या घरी जाऊन त्यांच्या घरची शांतता बिघडविणे योग्य नव्हे. ती आमची संस्कृती नव्हे. जर आमदाराचा निषेध करायचा होताच तर तो त्यांच्या कार्यालयात जाऊन करणे शक्य होते. मात्र, आपचे कार्यकर्ते थेट आमदाराच्या घरी जाऊन घरचे शांततामय वातावण बिघडवून टाकतात हे निषेधार्य असल्याचे दामू नाईक म्हणाले.
दहा आमदारांचे पक्षांतर हे गोव्याच्या विकासासाठी
गोव्यात भाजपचे शिस्तबद्द कार्य चालू आहे. तसेच संघटनसुद्धा मजबूत आहे. उद्या जर भाजपचे कार्यकर्ते आपच्या विरोधात पुढे आले तर ‘आप’ला त्यांचा मुकाबला करणे कठीण जाणार आहे. राजकारणात कोणी कुठे काय केले याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल. दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तो गोवा वाचविण्यासाठी व गोव्याचा विकास करण्यासाठी, असे ते म्हणाले.
विजय सरदेसाई ही गोव्याला लागलेली किड
गोव्याला विजय सरदेसाई यांच्या रूपाने एक किड लागली होती. जमिनीचे रूपांतर मोठय़ा प्रमाणात चालू होते. ही किड दूर करण्यासाठीच हे दहा आमदार भाजपमध्ये आले होते. आत्ता निवडणूक जवळ आल्याने आप स्टंटबाजी करीत आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे व आपले सामर्थ्य सिद्ध करावे असे दामू नाईक म्हणाले.
sगेले दोन दिवस आपचे तथाकथित नेते व कार्यकर्ते ज्या पद्धतीने नुवेचे भाजपचे आमदार बाबाशान यांच्या घराकडे मोर्चा घेऊन गेले, त्यांचे हे वागणे गोव्याच्या संस्कृतीला धरून नव्हते, त्याचा भाजप पूर्णपणे निषेध करत आहे. जर राजकारण रस्त्यावर येऊन करावे लागत असेल तर भाजपसुद्धा या गोष्टींकडे गांभीर्याने पहात आहे व त्याच गांभीर्याने त्याला प्रतिउत्तर दिले जाईल, असे नरेंद्र सावईकर म्हणाले.
दिल्लीत आपला दुसऱयांदा सत्ता मिळाली म्हणून ते देशभरात आपला विस्तार करु पाहत असल्यास भाजपची त्याला कोणतीच हरकत नाही. आपने गोव्यात जरूर प्रचार करावा, आपले काम जरूर करावे, मात्र, जे वागणे आहे त्याचा भाजप निषेध करीत आहे. जर याच पद्धतीने आपला आपले कार्य पुढे न्यायचे असेल तर त्याच पद्धतीने व त्याच भाषेत त्यांना प्रतिउत्तर देण्यास भाजप समर्थ असल्याचे सावईकर म्हणाले.