अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीने सर्व 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्लीतून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पटपडगंजमधून निवडणूक लढवतील. आपने विद्यमान 46जणांना उमेदवारी दिली असून 9 उमेदवार नवे आहेत. याशिवाय 8 जागी महिलांना संधी देण्यात आली आहे. तर 15 जणांची तिकिटे कापली असल्याचे पॉलिटिकल अफेयर्स कमिटीच्यावतीने सांगण्यात आले.
उमेदवार निश्चितीसाठी आपच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीच्या बैठकीत ही यादी निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया, दिल्लीचे प्रभारी संजय सिंह, प्रदेश अध्यक्ष गोपाल राय यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. उमेदवारांच्या निवडीसाठी पक्षाच्यावतीने स्वतंत्र सर्वे करण्यात आला होता. या सर्व निवडी सर्वे आणि वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारावर केल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
तिमारपूरमधून दिलीप पांडेय, बुराडीतून संदीप झा, बवानामधून जयभगवान, नरेलातून शरद चौहान, किराडीतून ऋतुराज झा, शालीमारबागमधून वंदनाकुमारी, तिलकनगरमधून जनरेलसिंग, जनकपुरीतून राजेश ऋषी यांना उमेदवारी दिली आहे. तर कालकाजी मतदार संघातून अवतारसिंह यांना उमेदवारी नाकारली असून येथून आतिशी मैदानात उतरणार आहेत. द्वारका मतदार संघातून लालबहाद्दूर शास्त्राr यांचे नातू आदर्श शास्त्राr यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मतदार संघात काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्र यांचे चिरंजीव विनय मिश्रा यांना तिकिट देण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. तर मतमोजणी 11 फेब्रुवारीला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी असून 24 तारखेपर्यंत अर्ज मागे घेत येणार आहेत. एकूण 70 जागांपैकी 12 जागा अनुसुचित जातीसाठी राखीव असून 58 जागा खुल्या गटासाठी आहेत. दिल्लीतील 1.46 कोटी मतदार त्यांचा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. गत 2015 च्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने उर्वरित सर्व पक्षांचा अक्षरशः धुव्वा उडवला होता. 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्राप्त केली होती.
आता होत असलेल्या निवडणुकीमध्ये आप आणि भाजपमध्येच प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्री आणि लोकजन शक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांनी सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काँग्रेस आपबरोबर आघाडी करणार काय, अन्य कोणते पक्ष दिल्ली विधानसभेच्या रिंगणात उतरणार याची उत्सुकता आहे. भाजपने आपली यादी संक्रातीनंतर प्रसिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर काँग्रेसने अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र समाज माध्यमांवर या तिनही प्रमुख पक्षांचे घोषणायुद्ध चांगलेच रंगले आहे.