मद्याच्या नशेत 7-7 दिवस राहतात गायब
वृत्तसंस्था/ चंदीगड
शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्याकडून आप खासदार भगवंत मान यांना मद्यपी संबोधिण्यात आल्याने वादंग निर्माण झाले आहे. आप प्रदेशाध्यक्ष मान हे मद्यपी आहेत, ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता शून्य आहे, तरीही ते मुख्यमंत्री झाले तर आनंदाच्या भरात मद्यातच बुडून जातील असे बादल यांनी म्हटले होते.
मान हे 7-7 दिवसांपर्यंत गायब होतात आणि सतत मद्यप्राशन करत राहतात असे आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांनीच मला सांगितले होते. मान यांनी मद्यपान करणे सोडणार असल्याची स्वतःच्या आईच्या नावाने खोटी शपथ घेतली होती. शपथेच्या काही दिवसांनीच त्यांनी मद्यपान केले होते असे बादल म्हणाले.
काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे मनोरुग्ण आहेत. सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्यानेच ते स्वतःच्या पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका करत आहेत असा दावा बादल यांनी केला.
बादल यांच्या या विधानांवर आप नेते राघव चड्ढा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बादल हे वैयक्तिक टिप्पणी करत आहेत. बादल यांनी अशाप्रकारच्या आरोपांद्वारे गलिच्छ राजकारण करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलापेक्षा बदनाम कुठलाच पक्ष नसल्याचे प्रत्युत्तर राघव यांनी दिले.