ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर ( नॉर्थ एव्हेन्यू) मंगळवारी हल्ला करण्यात आला आहे. अशी माहिती स्वतः संजय सिंग यांनी ट्विट करत दिली आहे. या घटनेत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
संजय सिंग यांनी ट्रस्टवर जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत 18.5 कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंग यांनी केली आहे.
संजय सिंग यांच्या आरोपांनंतर देशभरात खळबळ माजली असून याचवेळी त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. संजय सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावे, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर, असे म्हटले आहे.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी काही लोकांनी आपचे खासदार संजय सिंग यांच्या घरावरील नेमप्लेट काढण्याचा प्रयत्न केला आहे. डीसीपी दीपक यादव यांनी सांगितले की, त्या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले आहेत.