काँग्रेसचे दिनेश गुंडूराव यांचा दावा समविचारी पक्षांशी युतीचे दिले संकेत
प्रतिनिधी /पणजी
तृणमुल काँग्रेस आणि आप या भाजपपुरस्कृत शक्ती गोव्यात येऊन पैसा आणि सत्तेचे गाजर दाखवून काँग्रेस उमेदवारांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. भाजपविरोधी मते फोडून भाजपला विजयी करण्याचे राजकारण दोन्ही पक्ष खेळत आहेत, असा जोरदार आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केला आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील निधर्मी, समविचारी पक्ष आणि नेत्यांशी युती करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. शमा महम्मद, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पक्षाध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, महिला अध्यक्ष बीना नाईक, अमरनाथ पणजीकर यांची उपस्थिती होती. तृणमूल पक्षाने नुकताच गोव्यात प्रवेश केला आहे तर आम आदमी पार्टी 2017 पासून राज्यात कार्यरत आहे.
राज्यात बाहेरून आलेले काही पक्ष सध्या तळागाळात काम न करताच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांना पैसा व बळाचा वापर करून स्वतःकडे नेत आहेत. तृणमूल आणि आप हे दोन्ही पक्ष भाजपपुरस्कृत असून भाजपविरोधी मते फोडून भाजपला विजयी करणे हेच त्यांचे राजकारण आहे, असा आरोप राव यांनी केला. या प्रकारामुळे धार्मिक सलोखा बिघडण्याचा धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
अशाप्रकारे निवडणुकीपूर्वीच नेते खरेदीसाठी कोटय़वधी रुपयांचे सौदे होऊ लागले आणि हेच लोक विजयी झाले तर ते राज्याला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊच शकणार नाहीत, असा दावा राव यांनी केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सत्तेवर आल्यास स्थीर व भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यात येईल, असे आश्वासन राव यांनी दिले.