प्रतिनिधी / पणजी :
आप हा एकच असा पक्ष आहे जो सर्वसामान्य गोवेकर जनतेचा आवाज बनलेला आहे कारण या पक्षानेच गोवेकरांच्या रोजच्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आमचे नेते प्रत्येक मुद्यावर अग्रेसर राहिलेले आहेत. असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे नवे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केले
गेल्या काही वर्षांमध्ये सर्वोत्तम नेतृत्व आपल्या स्वतःच्या उदाहरणाने उभे केल्याबद्दल मला एल्विस गोम्स यांचे आभार मानले पाहिजे. प्रत्येक आप नेता आणि स्वयंसेवक यांना त्यांचे कार्य उत्कृष्टरित्या करण्यासाठी आधार देणे हे माझे लक्ष्य आहे असे राहुल म्हांबरे यांनी पुढे सांगितले.
आप पक्षाशी एकमत असलेल्या आणि पक्षाचे हितचिंतक असलेल्या सर्वांनी पक्षात यावे आणि पक्षाच्या कार्यात सामील व्हावे. ज्याप्रमाणे गोव्यात राजकारण केले जाते, ते बदलण्याची ही एक फार मोठी संधी आहे. गोवेकरांनी हे समजून घेतले पाहिजे की सध्याच्या काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांपैकी कुणालाही जर तुम्ही मतदान केले, तरी त्याचा परिणाम हा एकच राहणार आहे. भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांबरोबर डील आणि संगनमत केलेले असून एकमेकांबरोबर मिसळून एक भ्रष्ट व्यवस्था तयार करून ठेवली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये कोणीही सत्तेत का असेना, ते एकमेकांची काळजी घेतात व एकमेकांना सांभाळून घेतले जाते. या महामारीमध्ये लोक मरत असतानाही केवळ पैसा कमावणे, केवळ एवढाच त्यांचा एकमेव उद्देश राहिलेला आहे. असेही राहुल म्हांबरे यांनी यावेळी सांगितले.
सध्या गोव्यात काय चालले आहे हे लोकांना माहीत आहे. आर्थिक घोटाळे आणि गैरव्यवहारांची एक मालिकाच, तीही अशा महामारीच्या काळय़ा आणि बिकट काळात आपल्याला पाहायला मिळत आहे. गोव्यातील लोकांनी हे सर्व सहन करायची गरज आहे का? आम्ही हे सर्व मुद्दे आप पक्षाने वर उचललेले आहेत. पण आम्हाला अजून जास्त पाठिंब्याची गरज आहे. आम्हाला गोवा एक घोटाळामुक्त राज्य बनवायचे आहे. सर्व निकषांच्या बाबतीत एक प्रथम क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे असे राहुल म्हांबरे म्हणाले.
आम्ही एक प्रचंड मोठय़ा स्तरावरची सदस्य नोंदणी मोहीम आता लगेच सुरू करणार आहोत. ज्या लोकांना गोव्याच्या विकासासाठी काम करायची इच्छा आहे, अशांसाठी आमच्या पक्षाची दारे उघडी आहेत. आप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना नेतृत्व आपल्या हातात घेऊन पक्षाला गोवेकरांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे. असे आवाहन म्हांबरे यांनी केले आहे. तसेच पक्षाचे ज्ये÷ कार्यकर्ते अगदी खालच्या मूळ स्तरावर कार्य करीत असून आप आता बूथ स्तरावरील जडणघडण अधिक मजबूत करण्याचे नियोजन करीत आहे. असेही म्हांबरे यांनी अधिक माहीती देताना सांगितले.