आपचे कार्यकर्ते रविवारी पुन्हा नुवेत : महिला कार्यकर्त्यांवर हात घातल्याचा आरोप,बाबाशानचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
बाबाशान म्हणाले…
- प्रतिमा कुतिन्होंनी स्वतःचे पक्षांतर विसरु नये
- काँग्रेसमध्ये असताना निषेध का केला नाही
- आपल्या पक्षांतराचा नुवेच्या विकासाला लाभ
- विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे लाभले पूर्ण सहकार्य
प्रतिनिधी /मडगाव
नुवेचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांच्या घरासमोर काल रविवारी धरणे धरण्यासाठी गेलेल्या आप कार्यकर्ते आणि डिसा यांचे कार्यकर्ते यांच्यात पुन्हा जोरदार संघर्ष झाला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखून धरल्याने अनुचित प्रकार घडला नाही. खुद्द आमदार बाबाशान हे प्रचंड आक्रमक झाले होते. फातोडर्य़ाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी त्यांना रोखून धरतानाच त्यांची समजूत काढली. त्यामुळे संभाव्य हाणामारी टळली. दिवसभर नुवे परिसरात तणावग्रस्त वातावरण होते.
शनिवारी आपचे कार्यकर्ते प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्तीने भाजपचे आमदार बाबाशान यांच्या घरी ‘काळा केक’ देण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाबाशान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून धरले होते. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त राडा झाला होता. आपच्या कार्यकर्त्यांवर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याबरोबरच धक्काबुकी झाली होती.
आपचे कार्यकर्ते रविवारी पुन्हा नुवेत
आपच्या महिला कार्यकर्त्यांना हिन वागणूक दिल्याच्या निषेधार्थ काल रविवारी आपचे कार्यकर्ते राहूल म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बाबाशान डिसा यांच्या घरोसमोर धरण्यासाठी काल मोठय़ा संख्येने एकत्र आले होते. आमदार डिसा यांच्या घराजवळ जाण्यापूर्वी राहूल म्हांबरे यांनी आपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शनिवारच्या घटनेचा निषेध केला.
पक्षांतराचा नुवेच्या विकासाला लाभ
आपचे कार्यकर्ते धरणे धरण्यासाठी येणार असल्याची चाहूल लागलेल्या बाबाशानच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. या कार्यकर्त्यांना आमदार बाबाशान यांनी मार्गदर्शन करताना, आपण पक्षांतर केले ते विकासासाठी व नुवे मतदारसंघाचा विकास करण्यात आपण यशस्वी झाल्याचा दावा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विकास कामांसाठी पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिमांनी स्वतःचे पक्षांतर विसरु नये
प्रतिमा कुतिन्हो या नावेली येथील असून त्यांनी काँग्रेसमध्ये राहूनच जर आपल्या पक्षांतराचा निषेध केला असता तर तो समजण्याजोगा होता. स्वतः प्रतिमा कुतिन्हो यांनी पक्षांतर केले आहे. त्यांनी काँग्रेसमधून आपमध्ये प्रवेश केला. तो कशासाठी याचे उत्तर अगोदर जनतेला द्यावे व नंतरच आमच्या कृतीचा निषेध करावा. प्रतिमा कुतिन्हो या नावेली मतदारसंघात राहतात, त्यांनी अगोदर नावेलीकडे पहावे, त्यांना नुवे मतदारसंघात येण्याचा अधिकार नसल्याचे बाबाशान यावेळी म्हणाले.
प्रतिमा साध्या पंचसुद्धा होणार नाही
शनिवारच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या आमदार बाबाशान यांनी काल प्रतिमा कुतिन्होवर सडकून टीका केली. प्रतिमा कुतिन्होचे सर्व विक्रम गोव्यातील लोकांना ठावूक आहेत. त्यांनी दिल्लीतसुद्धा विक्रम केल्याचे बाबाशान म्हणाले. आपल्या समर्थकांना अपशब्द देण्याचा अधिकार प्रतिमा कुतिन्हो यांना नाही. त्या आमदार सोडाच, साध्या पंच सुद्धा होणार नसल्याची टीका यावेळी करण्यात आली.
आपचे कार्यकर्ते बाबाशान यांच्या घराजवळ जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी बाबाशानच्या समर्थकांना देखील पोलिसांनी रोखून धरले होते. आपच्या कार्यकर्त्यांनी बाबाशानची प्रतिमा करून सोबत आणली होती व तिला आग लावण्याची तयारी ठेवली होती. ही प्रतिमा अगोदर पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांकडून हिसकावून घेतली. यावेळी काही आपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बाबाशानच्या प्रतिमेवर ‘प्रतिमा’ची लाथ…
पोलिसांनी बाबाशानची प्रतिमा ताब्यात घेताच आपच्या प्रतिमा कुतिन्हो संतप्त झाल्या. त्यांनी याच गोंधळात बाबाशानच्या प्रतिमेवर लाथ मारली. यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांना महिला पोलिसांनी अडविले. त्यामुळे आपच कार्यकर्ते आणखीन भडकले व त्यांनी प्रतिमाच्या सुटकेची मागणी केली.
आमदार बाबाशानला पोलीस निरीक्षकांनी रोखले
या संपूर्ण घटनेमुळे आमदार बाबाशान हे प्रचंड संतप्त झाले होते. पोलिसांचे कडे तोडून ते आपच्या कार्यकर्त्यांना भिडणार तोच पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी त्यांना रोखून धरले. त्यांची समजूत काढली. यावेळी बाबाशान यांना राग अनावर झाला होता. जर पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी त्यांना रोखले नसते तर मात्र, काल नुव्यात प्रचंड हाणामारी झाली असती. बाबाशानचे समर्थक देखील तयारीनिशी आले होते.
आपच्या कार्यकर्त्यांना माघारी पाठविले
पोलिसांनी अगोदर आपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता शनिवारच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आल्याचे आपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, शनिवारी या ठिकाणी येऊन तुम्ही काय मिळविले असा उलट सवाल देखील पोलिसांनी उपस्थितीत केला असता, पोलीस आमदार बाबाशान याची बाजू घेत असल्याचा समज करून आपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची हुर्या उडविली.
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले तर प्रचंड हाणामारी होणार याची खात्री असलेल्या पोलिसांनी अगोदर आपच्या कार्यकर्त्यांना माघारी पाठविले. आपचे कार्यकर्ते घोषणाबाजी देत माघारी फिरले. नंतर बाबाशान यांचे समर्थक देखील शांत झाले. आपच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा जर जबरदस्ती केली तर त्यांनाच तेव्हढय़ाच प्रभावीपणे उत्तर देण्याची तयारी असल्याचे बाबाशानच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पुढील निवडणुकीत बाबाशान यांचा विजय नक्की असल्याचा दावा केला.