नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आम आदमी पक्षाचे दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंदर जैन यांच्या कुटुंबियांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता त्यांनी मनी लाँडरिंगच्या माध्यमातून कमावली होती, असा आरोप ईडीने ठेवला आहे. या कुटुंबियांवर धाडी घालण्यात आल्या होत्या, त्यावेळी मालमत्तेचा छडा लागला होता.
सत्येंदर जैन यांच्या कुटुंबियांच्या अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इंपॅक्स लिमिटेड, पारयस इन्फोसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, जे. जे. आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्या आहेत. या कंपन्या मनी लाँडरिंगच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करतात असे आढळून आले आहे. हा काळा पैसा कोठून आला याचा शोध घेतला जात आहे. सत्येंदर जैन यांच्या नातेवाईक स्वाती जैन, सुशिला जैन आणि इंदू जैन यांच्या नावानेही बेहिशेबी मालमत्ता असल्याचे धाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून उघड झाले.
2015 ते 2016 या काळात सत्येंदर जैन हे पब्लिक सर्व्हंट होते. वर उल्लेखिलेल्या कंपन्या या त्यांच्या कुटुंबियांच्या नावांवर त्याचवेळी स्थापन झालेल्या होत्या. तथापि, त्यांच्यात गुंतवणूक आणि या कंपन्यांचे नियंत्रण जैन यांच्याच हाती होते, असे तपासात आढळून आले आहे. या कंपन्यांमध्ये 4.81 कोटी रुपयांची रक्कम बेहिशेबी पद्धतीने जमा केल्याचे दिसून आले. हा पैसा कोलकाता येथील काही बनावट कंपन्यांमधून या कंपन्यांमध्ये हस्तांतरीत करण्यात आला होता.
आता या प्रकरणाची चौकशी सुरु असून जैन यांच्या कुटुंबियांना अटक होण्याची शक्यता आहे. हा पैसा हवालाच्या माध्यमातून जमा झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे ईडीने आरोपांमध्ये स्पष्ट केले आहे.