नवी दिल्ली / वृत्तसंस्था
श्रद्धा हत्या प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपी आफताबला शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा निर्णय घेण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना आंबेडकर रुग्णालयात नेले होते. येथूनच तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला. न्यायालयीन कोठडीनंतर त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.
आफताबची आयपीसी कलम 365/302/201 अंतर्गत पॉलिग्राफ चाचणी झाली असून आता सोमवारी नार्को चाचणी होण्याची संभावना आहे. त्याची प्रकृती उत्तम नसल्यामुळे नार्को चाचणीला विलंब होत आहे. दरम्यान, श्रद्धा हत्याकांडात आफताबविरुद्ध महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. जंगलातून मिळालेली हाडे श्रद्धाची असल्याचे फॉरेन्सिक तपासणीत समोर आले आहे. त्याचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.