’आप’ नेते अमित पालेकर यांची हमी
प्रतिनिधी / पणजी
आम आदमी पक्षाच्या कोणत्याही आमदाराने पक्षांतर केल्यास कायद्याने त्याची आमदारकी रद्द करण्यात येईल. त्यादृष्टीने कायदेशीर बाबी पडताळणे सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आपचे आमदार कधीच कोणत्याही पक्षात उडय़ा मारणार नाहीत, अशी हमी आप नेते ऍड. अमित पालेकर यांनी दिली आहे. सध्या राज्यात अत्यंत गलिच्छ पातळीवर राजकारण सुरू असून काही पक्ष तर पक्षांतरसम्राट बनले आहेत. याच राजकीय नेत्यांनी पक्षांतरांचे धडे राष्ट्रीय स्तरावर नेले आहेत, असा टोलाही पालेकर यांनी लगाला आहे.
सध्यस्थितीत आपला उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करणार नाही याची खात्री देऊ शकेल असा एकही पक्ष राज्यात नाही. 2017 मध्ये काँग्रेसचे दहा आमदार भाजपात सामील झाले. आता. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच, ऍलेक्स रेजिनाल्ड तृणमूलमध्ये सामील झाले. म्हापसा पालिकेत भाजपला विजय मिळवून देणारे ’काँग्रेसचे उमेदवार’ सुधीर कांदोळकर हे आता स्वतःही भाजपात सामील होण्याच्या मार्गावर आहे. यावरून भाजपला बहुमत मिळू शकत नाही, हेच सिद्ध होते, असे पालेकर म्हणाले.
छोटेखानी राज्य असले तरीही राजकीय पक्षांतरे करण्यात गोवा देशात अव्वलस्थानी आहे. अशावेळी आपण पक्षांतर करणार नाही याची ग्वाही देण्यासाठी आम आदमी पक्षाचा प्रत्येक उमेदवार शपथपत्रावर स्वाक्षरी करतील व ते गोव्यातील मतदारांमध्ये वितरित करतील. तरीही पक्षांतर केलेच तर लगेचच त्याला आमदार म्हणून अपात्र ठरवले जाईल, असे पालेकर यांनी गुरुवारी सांगितले.
पक्षांतरांचा सारीपाट मांडलेल्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या राजकारणाला कंटाळलेले लोक नवीन पर्यायाच्या, बदलाच्या प्रतीक्षेत आहेत, असे पालेकर पुढे म्हणाले.