ता. पं. इओंना आला अनुभव : जमखंडी सरकारी रुग्णालयातील प्रकार : लस असूनही नसल्याचे स्पष्टीकरण
वार्ताहर / जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता पसरली आहे. त्यामुळे लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता आहे. मात्र, असे असले तरी लस उपलब्ध नसल्याचे सांगून अनेक ज्येष्ठ नागरिकांना परत पाठविण्यात येत असल्याचा प्रकार येथील सरकारी रुग्णालयात घडत आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव ता. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी अबिद गद्याळ यांना आला. येथील सरकारी रुग्णालयात कोरोनाची लस घेण्यासाठी गद्याळ आले होते. मात्र, यावेळी आमच्याकडे लस उपलब्ध नसून तुम्ही उद्या या, असे वैद्यकीय कर्मचाऱयांनी सांगितल्याने गद्याळ चकीत झाले.
दरम्यान, ही व्यक्ती सामान्य नसून ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी असल्याचे एका कर्मचाऱयाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने अन्य कर्मचाऱयांना याची माहिती दिली. यावेळी गद्याळ यांनी किती जणांना लस दिली व त्याच्या नोंदी तपासून पाहिल्या. त्यानंतर गद्याळ किती जणांना लस देण्यात आली आहे, असे कर्मचाऱयांना विचारले. काहींना 82 तर काहींनी 120 जणांना, अशी उत्तरे दिली. मात्र, प्रत्यक्षात 25 जणांची नोंद झाल्याचे पाहून गद्याळ यांनी सर्वांना धारेवर धरले.
आपल्यालाच असा अनुभव आला आहे. तर जनतेला तुम्ही कोणती सेवा देत आहात, असा सवाल गद्याळ यांनी केला. काही वेळानंतर मुख्य वैद्याधिकारी डॉ. कृष्णा बन्नद दाखल झाल्यानंतर वेळ संपल्याने लसीकरणास आलेल्यांना परत पाठविल्याची सारवासारव केली. यानंतर ता. पं. अधिकाऱयांना लस देण्यात आली. यानंतर गद्याळ यांनी केंद्राकडे येण्याचा मार्गसूचक फलक लावण्याची सूचना अधिकाऱयांना केली.