काँग्रेस अध्यक्षांकडून मोदींवर शरसंधान
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान केले आहे. सूरत येथील सभेत खर्गे यानी स्वतःला अस्पृश्य अन् पंतप्रधानांना असत्याचा सरदार संबोधिले आहे. पंतप्रधान स्वतःला गरीब म्हणवून घेतात, परंतु माझ्याहून मोठा गरीब कोण असणार, मी तर अस्पृश्य आहे असे विधान खर्गे यांनी केले आहे.
मोदी हे नेहमी स्वतःला गरीब म्हणवून घेतात. परंतु आम्ही देखील गरीब आहोत. आम्ही तर गरीबातील गरीब आहोत. कमीत कमी मोदींच्या हातचा चहा तरी कुणी पितो, माझ्या हातचा चहाही कुणी पित नाही. तरीही मोदी आपण गरीबच असल्याचे सांगतात अशा शब्दांत खर्गे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने मागील 70 वर्षांमध्ये काय केले अशी विचारणा नरेंद्र मोदी आणि अमित शाह करतात. जर 70 वर्षांमध्ये काम केले नसते तर आम्हाला ही लोकशाही मिळाली नसती. मोदी हे गरीबीबद्दल बोलून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असले तरीही लोक आता सुजाण झाले आहेत. असत्याद्वारे एकदा धूळफेक केली जाऊ शकते, परंतु भाजप नेते वारंवार खोटं बोलत आहेत. मोदी हे खोटारडेपणाचे सरदार आहेत असे खर्गे यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील भाजप सरकार गरीबांच्या जमिनी बळकावत आहे. सरकारकडून आदिवासींना जमीन मिळत नाही. जमीन, पाणी अन् जंगल संपविले जात आहे. धनाढय़ांसोबत मिळून सरकार जनतेची लूट करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे.