आमदार सुदिन ढवळीकरांची मागणी
वार्ताहर / मडकई
कोरोना जागतिक महामारीसाठी आमदार व मंत्र्यांकडून मदत निधी स्वीकारताना एका महिन्याचे वेतन सर्व भत्यांसह मुख्यमंत्री निधीत जमा केला जावे. त्यापैकी अर्धा निधी पंतप्रधान मदत निधीत जमा करावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर केली आहे. जगावर आलेल्या या संकट काळात पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही विरोधात असलो तरी आमचे पूर्ण सहकार्य असेल, असेही रामनाथी येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार ढवळीकर म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात मडकई व फोंडा मतदार संघातील जनतेचे सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोरोना संक्रमणाशी सामना करण्यासाठी गोवा सरकारने विविध योजना तयार केलेल्या आहेत. ‘नरो वा गुंजरो’ भूमिकेमुळे त्या फलदायी होऊ शकल्या नाहीत. राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांनी मदत निधी उभारण्यासाठी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून सर्व आमदार व मंत्र्यांचे केवळ एका महिन्याचे वेतन न घेता ते भत्यांसह आकारले जावे. एका आमदाराला साधारण रु. 1 लाख 89 हजार एवढे वेतन भत्यांसह मिळते. राज्यपाल, मुख्यसचिव, सचिव, सहसचीव तसेच सरकारी उच्च अधिकारी, सरपंच, पंचसदस्यांनाही आपले वेतन जमा करणे सक्तीचे असले पाहिजे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये भेदभाव करू नये, तसेच एकदा घेतलेला निर्णय कुठल्याही दबावाखाली न येत्या त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, अशी सूचनाही आमदार ढवळीकर यांनी केली.
खाजगी आस्थापनानींही मदत निधीत आपला वाटा उचलावा. या आणिबाणीच्या काळात देशाला व राज्याला आर्थिक मदतीची गरज आहे. राज्यातील इस्पितळांमध्ये सध्या व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. आवश्यकतेप्रमाणे ते उपलब्ध केले जावेत. हॉटेल व्यावसाय व इतर उद्योग ठप्प झाले आहेत. केंद्रातून उपलब्ध होणार आपत्तकालीन निधी म्हणून शंभर कोटी रुपये आज 7 एप्रिल रोजी राज्याला मिळणार आहे. या निधीतून कितपत साधनसुविधा उभारणे शक्य आहे, हा प्रश्न मुख्यमंत्री डॉ सावंत यांना पडलेला असेल, असेही ते म्हणाले.
रामथान देवस्थान समिती चेरिटेबल टॅस्ट व महालक्ष्मी देवस्थानने गरजूंना कडधान्य वितरीत करून समाजिक जबाबदारी उचलल्याबद्दल त्यांचे आमदार ढवळीकर यांनी अभिनंदन केले. माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत मडकई मतदार संघाबरोबर इतर भागात सात हजार गरजू कुटुंबाना मतद केली असून यापुढेही हे कार्य सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रामनाथ देवस्थानचे खजीनदार मयुर केणी यांनी देवस्थान समितीच्या व ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. ट्रस्टी गजानन सांबारी, सचिव बाजीराव, बांदोडय़ाचे सरपंच, उपसरपंच व पंचसदस्य उपस्थित होते.