कार्लुस आल्मेदा यांचा आमदारकीचा राजीनामा : भाजप उमेदवारी नाकारण्याची होती भीती
प्रतिनिधी /पणजी
भाजपचे वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी भाजपसह आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यांनी आपले राजीनामा पत्र सभापती राजेश पाटणेकर यांच्या कार्यालयात काल मंगळवारी सादर केले. भाजपचे राजीनामा देणारे हे दुसरे आमदार असून याआधी एलिना साल्ढाणा यांनी भाजपसह आमदारकीचा राजीनामा दिला होता. आल्मेदा यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या आता 33 पर्यंत खाली आली असून आतापर्यंत एकूण 7 आमदारांनी राजीनामा दिला आहे.
राजीनाम्यानंतर त्यांनी सांगितले की, भाजपने मला दुखावले असून बाजूला केले आहे. भाजपला आता मी नकोसा झालो असून त्याचा परिणाम म्हणून राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपात नुकतेच प्रवेश केलेले दाजी साळकर यांच्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. मला उमेदवारी नाकारण्यात येणार असून ती साळकरना देण्यात येणार असल्याने त्यांच्यासाठी व त्यांच्या हाताखाली मी काम करु शकत नाही, असेही निवेदन आल्मेदा यांनी केले.
भाजपविरोधात लढणार
साळकरांच्या विरोधात कोमुनिदाद घोटाळा तक्रार दिली होती. त्याची कोणतीच दखल पक्षाने घेतली नाही. उलट साळकरांना अधिक महत्त्व देण्यात आले. वास्कोची जागा भाजपविरोधात लढणार असून जिंकणार असल्याचा दावा आल्मेदा यांनी केला आहे. भाजपमध्ये आता निष्ठावंतांना स्थान नाही आणि किंमतही नाही. उलट बाहेरुन प्रवेश करणाऱयांना महत्त्व दिले जाते. निष्ठावंताना गृहित धरले जात असल्याचा आरोप त्यांनी पुढे बोलताना केला.
आपले समर्थक, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन चर्चा करुन कोणत्या पक्षात जायचे ते ठरवणार असल्याचे ते म्हणाले. आपण सध्या सर्व पक्षांच्या संपर्कात असून मतदारांना विचारुन योग्य तो निर्णय घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.