डीएसपीसह पोलिसांना नोटिसा
प्रतिनिधी/ बेळगाव
कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर पोलीस अधिकाऱयांनी पुष्पवृष्टी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही पुष्पवृष्टी पोलीस अधिकाऱयांना महागात पडली असून जिल्हा पोलिस प्रमुखांनी डीएसपीसह पाच जणांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत.
2 सप्टेंबर रोजी आमदार महांतेश दोड्डगौडर यांचा 48 वा वाढदिवस होता. बैलहोंगल येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱयांनी महांतेश व त्यांच्या पत्नीवर पुष्पवृष्टी केली. दोन दिवसांनी या संबंधीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
काही खासगी वाहिन्यांनी हा व्हिडीओ प्रसारित करताच एकच खळबळ माजली आहे. महांतेश दोड्डगौडर हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत. त्यांना सपत्नीक एका सोप्यावर बसवून पोलीस अधिकाऱयांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते.
लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी कंत्राटदार, सरकारी अधिकाऱयांची घाई असते. या घाईगडबडीत बैलहोंगलचे पोलीस उपअधिक्षक शिवानंद कटगी, मंडल पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ मल्लण्णावर, नेसरगीचे पोलीस उपनिरीक्षक एल. वाय. शिगीहळ्ळी यांच्यासह पोलीस व गुप्तचर विभागातील एकूण सहा जणांनी या पुष्पवृष्टीसाठी हजेरी लावली होती.
या संबंधीचा व्हिडीओ व्हायरल होताच जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी डीएसपीसह पोलीस दलातील पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संबंधी तरुण भारतने पोलीस प्रमुखांशी संपर्क साधला असता गुप्तचर दलातील अधिकारी वगळता पोलीस दलातील पाच जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.