न्यायमूर्ती महेश सोनक यांची टिपणी : खास न्यायपीठ स्थापन होण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्षातून राजीनामा न देता भारतीय जनता पक्षात विलीन झालेल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याची याचना करणारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सादर केलेली याचिका गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयासमोर काल सोमवारी सुनावणीस आली पण न्यायमूर्ती महेश सोनक यांनी याचिका सुनावणीसाठी आपल्यासमोर न ठेवण्याची टिपणी केली. त्यामुळे सदर याचिकेवरील सुनावणी घेण्यासाठी आता खास न्यायपीठ स्थापन होण्याची शक्यता आहे.
याचिकादार गिरीश चोडणकर यांच्यावतीने प्रसिद्ध वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. त्यांना साहाय्य करण्यासाठी ऍड. अभिजित कामत, ऍड. साहिल टागोत्रा, ऍड. निझाम पाशा व ऍड. ए. नाईक हजर होते.
सभापतींच्यावतीने भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. त्यांना साहाय्य करण्यासाठी ऍड. रजत नायर उपस्थित होते.
लवकरात लवकर सुनावणी घेऊन संपवावी
या याचिकेत प्रतिवादी सर्व 10 आमदारांना याचिकादाराने खासगी नोटीस बजावली आहे, मात्र या आमदारांकडून कोणताच वकील हजर नव्हता किंवा कोणताही आमदार न्यायालयात प्रत्यक्ष हजर नव्हता. त्यांचा प्रतिनिधीही हजर नव्हता. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असून येत्या मार्च 2022 मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार अपात्रता आव्हान याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेऊन संपवावी, अशी बाजू ऍड. कपिल सिब्बल यांनी मांडली.
सुनावणी आपल्यासमोर नको
गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती एम. एस. सोनक व न्या. श्रीमती. एम. एस. जवळकर यांच्या न्यायपीठासमोर सदर याचिका सुनावणीस आली तेव्हा न्या. एम. एस. सोनक यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. या याचिकेत जे प्रतिवादी आमदार आहेत त्यापैकी काहीजण आपले अशील होते, त्यामुळे सदर सुनावणी घेणे योग्य नसून सदर याचिका आपल्यासमोर ठेवण्यात येऊ नये, अशी टिपणी त्यांनी केली.
याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी वेगळे न्यायपीठ गठन करण्यात येणार असून पुढील आठवडय़ात द्विसदस्यीय खास न्यायपीठ स्थापन होण्याची शक्यता आहे.