प्रतिनिधी / पणजी
सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या 2 अपात्रता याचिकांपैकी 1 याचिका मगो पक्षाने मागे घेतली तर दुसरी याचिका मात्र कायम ठेवली आहे. दरम्यान या प्रकरणाचा निवाडा तयार झाला की सर्व संबंधितांना नोटिसा देऊन तो जाहीर करण्यात येणार असल्याचे पाटणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची अन्य एक अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित असून सभापती काय निवाडा देतात, याची प्रतिक्षा तेथे करण्यात येत असून त्यानंतरच सर्वोच्च न्यायालय निवाडा देणार असल्याचे सांगण्यात आले. सभापती व न्यायालय असे दोन्ही ठिकाणचे निकाल कधी लागणार याचा कोणताही पत्ता नसल्याचे दिसून येत आहे.
मगोचे पुर्वाश्रमीचे आमदार बाबू आजगांवकर व दीपक पाऊसकर या दोघांनी मगोला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. त्यांच्या विरोधात मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी 3 मे 2019 व 10 मे 2019 रोजी अशा दोन अपात्रता याचिका सभापतींसमोर सादर केल्या होत्या. त्या याचिका संदर्भात विचारणा करण्यासाठी सभापती पाटणेकर यांनी ढवळीकर यांना पाचारण केले होते.
ढवळीकर काल बुधवारी आपल्या वकिलासह सभापतींच्या कार्यालयात उपस्थित राहिले. त्यावेळी दोन्ही याचिकांवर सुनावणी झाली. दोन्ही याचिका समानच असल्याने त्यातील एक याचिका मागे घेण्याची सूचना सभापतींनी केली आणि त्यानुसार ढवळीकर यांनी 10 मे 2019 ची याचिका मागे घेतली. आता 3 मे 2019 ची एकमेव याचिका सभापतींसमोर शिल्लक असून त्यावर लवकरच निवाडा देणार असल्याचे सभापतीनी सांगितल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.
सभापतींनी निवाडय़ासाठी कोणतीही तारीख दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयातही तशीच परिस्थिती असून निकाल कधी होणार याची माहिती कोणालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.