प्रतिनिधी / पणजी :
सभापती राजेश पाटणेकर हे आजारी पडल्याने व त्यांनी तसे सर्वोच्च न्यायालयाला कळविल्याने आता 12 आमदारांच्या अपात्रता याचिकांना न्यायालयात सुनावणीस येण्यास मुहूर्त मिळेना, अशी परिस्थिती झाली आहे.
आतापर्यंत तीन वेळा याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलल्याने 12 ही आमदारांना अच्छे दिन आले आहेत. या सुनावणीमधील आणखी एक वादी मगो नेते सुदिन ढवळीकर हे देखील कोविड 19 मुळे आजारी पडल्याने त्याचाही विचार सुनावणीवेळी होणार असल्याने आता या याचिका पुन्हा कधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येतील हे कळत नाही.
एकंदरीत वारंवार सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने या याचिका दाखल करणाऱयांचा हिरमोड झालेला आहे. अद्याप पुढील सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे या याचिकांवरील सुनावणीबाबत असलेल्या उत्कंठेचे प्रमाण देखील आता कमी होत चालले आहे. तोपर्यंत 12 ही आमदारांना जीवदान मिळालेले आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका उपमुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांविरुद्ध आणि मगोचे सुदिन ढवळीकर यांनी एका उपमुख्यमंत्र्यांसह 2 आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केलेल्या आहेत. या याचिकांबाबत राजकीय क्षेत्रात कमालीची उत्सुकता लागलेली आहे.