प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस व मगोच्या फुटीर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे सुनावणी घेणे शक्य झाले नही, असा दावा सभापती राजेश पाटणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. काँग्रेसचे 10 आमदार तर मगोचे 2 आमदार फुटले आणि ते भाजपवासी झाल्यानंतर त्या दोन्ही पक्षांनी सभापतींसमोर त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका सादर केली होती. त्यास एक वर्षाचा काळ लोटला असून त्या याचिका सभापतींकडे निकालाविना प्रलंबित आहेत. त्या तेथे फाईलबंद अवस्थेत असून सभापती निकाल देत नाही म्हणून काँग्रेस, मगो या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात या पूर्वीच धाव घेऊन त्या याचिका 3 महिन्यात निकालात काढा अशी मागणी केली होती. त्या दोन्ही याचिका एकत्र करून मंगळवार दि. 11 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहे. त्या निकालावर सर्व फुटीरांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.