उच्च न्यायालयाचा इशारा पुढील सुनावणी 20 डिसेंबरला
प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षात विलीन झालेल्या सर्व 12 आमदारांच्या पात्रतेचा प्रश्न आता गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात दि. 20 डिसेंबरपासून सुनावणीस येणार आहे. यापुढे सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही, असा इशाराही न्यायपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी दिला.
अपात्रता प्रकरणी तीन याचिका शुक्रवारी न्यायालयासमोर सुनावणीस होत्या. सुदिन उर्फ रामकृष्ण ढवळीकर यांनी सादर केलेली याचिका सुनावणीस 18 व्या क्रमांकावर होती, तर गिरीश चोडणकर यांनी सादर केलेली याचिका तसेच या याचिकेत हस्तक्षेप करणारी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने दुर्गादास कामत यांनी सादर केलेली याचिका सुनावणी 21 व्या क्रमांकावर होती.
युक्तीवादांसाठी दोन तासांची मागणी
याचिकादार गिरीश चोडणकर उच्च न्यायालयात सकाळी 10.30 वाजल्यापासून प्रत्यक्ष उपस्थित होते. अंतिम सुनावणीस असलेल्या सर्व याचिका प्राधान्य क्रमाने दुपारच्या सत्रात 2.30 पासून सुनावणीस घेतल्या जाणार, असे ठरल्यामुळे ते निघाले. शेवटी संध्याकाळी या तिन्ही याचिका सुनावणीस पुकारण्यात आल्या. वादी प्रतिवाद्यांचे वकील न्यायपीठासमोर उभे राहिले. युक्तिवाद मांडण्यास प्रत्येकाला किती वेळ लागेल हे स्पष्ट करावे, असे न्यायामूर्तींनी सूचवताच प्रत्येक वकिलांनी आपल्याला किमान दोन तास लागतील, अशी मागणी केली.
सुनावणी सलग घेतल्यास किमान तीन दिवस लागतील. त्यामुळे न्यायपीठासमोरील इतर याचिका तूर्त बाजूस ठेवून या अपात्रता याचिकेवर सुनावणी दि. 20 डिसेंबरपासून घेण्याचे यावेळी ठरले. आता सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही, अशी ताकिदही यावेळी न्यायमूर्ती दिली.