सुनावणीसाठी हजर न झाल्याने कारवाई
प्रतिनिधी / बेंगळूर
मालमत्तेसंबंधीची माहिती सादर न केल्याने प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे यांचे आमदारपद रद्द करावे, अशी मागणी करत याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर न झाल्याने बुधवारी उच्च न्यायालयाने ईश्वर खंड्रे यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ईश्वर खंड्रे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मालमत्तेसंबंधीचा तपशिल उघड केला नव्हता. त्यामुळे त्यांचे आमदारपद रद्द करावे, अशी याचिका सी. के. सिद्राम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने खंड्रे यांना समन्स बजावून सुनावणीसाठी हजर होण्याची सूचना केली होती. बुधवारी सुनावणीवेळी खंड्रे हजर न झाल्याने न्यायाधीश कृष्ण एस. दिक्षीत यांनी त्यांना 5 लाख रु. दंड ठोठावला. ही रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशाविषयी प्रतिक्रिया देताना ईश्वर खंड्रे यांनी, आपल्या स्वीय साहाय्यकाला स्मृतिभ्रंशचा विकार असल्याने न्यायालयीन सुनावणीची तारीख आपल्याला समजली नाही, असे सांगितले.