नदी, पर्यावरण प्रदूषित न करण्याचा नागरिकांना सल्ला
प्रतिनिधी /म्हापसा
हळदोणचे आमदार ऍड. कार्लुस आल्वारीस फरेरा यांनी जलस्त्रोत्र, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, अभियंता वर्गासमवेत म्हापसा येथील तार नदीची पाहणी केली. इतकेच नव्हे तर मयडे येथील पुलानजिकहून संपूर्ण तार नदीत होडीने अधिकाऱयांसमवेत पाहणी करून या नदीच्या पात्राची माहिती जाणून घेतली. पाण्यामध्ये वाढलेल्या मेनग्रुवची झाडे तशीच नदीच्या पात्रात नाहक वाढलेल्या झाडामुळे येथे गाळ उपसणे कठीण होऊन बसणार असून यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होण्याची खंत आमदार ऍड. फरेरा यांनी व्यक्त केली.
मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे हे काम अर्धवट राहिले काय असा प्रश्न आमदार ऍड. फरेरा यांना केला असता त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास टाळले. आपण कुणावरही आरोप करणार नाही वा कुणाच्या दुर्लक्षेमुळे हे काम थांबले असे म्हणणार नाही. उलट पावसाळय़ापूर्वी हे काम लवकरात लवकर कसे करता येईल याकडे आपण अधिक लक्ष देणार असल्याची माहिती आमदारांनी दिली. कृपया या जलस्त्रोतांना प्रदूषित करणे थांबवा. याचा परिणाम केवळ पर्यावरण आणि पर्यावरणाचा नाश होईल व त्याचा परिणाम आम्हालाच भोगावा लागेल अशी माहिती दिली.
नागरिक पर्यावरण तज्ञ आणि इतर मदतीसाठी पुढे आले आहेत आणि संबंधित अधिकाऱयांसोबत मिळून या समस्येचा सामना करण्याचा आमचा मानस आहे. आमच्याकडे काही अल्प मुदतीच्या आणि दीर्घकालीन योजना आहेत ज्यांना आम्ही त्वरित सुरुवात करू इच्छितो. पंचायत निवडणुका जवळ आल्याने आणि आचारसंहितेमुळे कामात अडथळे येत असल्याने आम्ही हे काम सर्वोच्च प्राधान्याने हाती घेत आहोत.
म्हापसा तार नदी आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला हवा. त्याचा फायदा भावी पिढय़ांना होईल याचे भान ठेवायला हवे. जर आम्ही आता कारवाई केली नाही तर खूप उशीर होईल असे ते म्हणाले. जलकुंभ वाढविण्याचे कारण म्हणजे साक्षरता कमी होणे असे ऍड. फरेरा म्हणाले.