प्रतिनिधी / वास्को
मुरगावचे माजी नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर हे त्यांच्या कुटुंबाकडील कोमुनिदादची जमीन बेकायदा विकण्याच्या प्रकारात गुंतलेले असून त्यांच्याविरूध्द आपण पोलीस तक्रार करणार असल्याचे वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी म्हटले आहे. ते हस्तांतरण कोमुनिदादच्या नियमांचा भंग करणारे असल्याचे आमदार आल्मेदा यांनी म्हटले आहे.
सतत तीन वेळा मुरगावचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले दाजी साळकर यंदा पालिका निवडुक लढवत नाहीत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आमदार कार्लुस आल्मेदा यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. यंदा ते पालिका निवडणुक लढवत नसले तरी त्यांच्या जागी त्यांची पत्नी शमी साळकर निवडणुक लढवीत आहेत. दाजी साळकर दुसऱयांदा विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. आज होणाऱया पालिका निवडणुकीसाठी त्यांनी आपल्या पॅनलचे उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी सात उमेदवार उभे केलेले असून काही प्रभागात ते इतर उमेदवारांना सहकार्य करीत आहेत. आपले उमेदवार जाहीर करताना त्यांनी आपला जाहीरनामाही प्रकाशीत केला होता. त्यात त्यांनी आपल्या कामांची माहिती दिली होती. मात्र, भाजपाचे वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा व त्यांच्या पदाधिकाऱयांनी या जाहीरनाम्याला आक्षेप घेतला आहे. यासंबंधी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी प्रदेश कार्यकारीणी सदस्य जयंत जाधव, महिला गट अध्यक्ष सुप्रीया नाईक, युवा गट अध्यक्ष गौरीष नाईक, मंडळाचे सचिव संदीप नार्वेकर व तुषार च्यारी यांच्या समवेत पत्रकार परिषदेत घेऊन दाजी साळकर यांच्यावर जमीन घोटाळय़ाचा व लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.
दाजी साळकर यांच्याविरूध्द पोलीस तक्रार करणार
दाजी साळकर यांच्या कुटुंबाची त्यांना कोमुनिदाद संस्थेने दिलेली जमीन वास्को शहरा नजीक होती. ही जमीन 2007 मध्ये दिल्लीतील व्यक्तीला विकण्यात आलेली असून जमीनीची मालकी मिळाल्यानंतर दहा वर्षांच्या आत अशी जमीन विकणे कोमुनिदादच्या नियमानुसार गुन्हा आहे. शिवाय अशी जमीन व्यवसायीक कारणासाठी विकता येत नाही. दाजी साळकर अशा गुन्हय़ात गुंतलेले असून हा जमीन घोटाळाच आहे. आपण दाजी साळकर यांच्या विरूध्द पोलीस तक्रार करणार आहे असे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी म्हटले आहे.
जाहीरनाम्याद्वारे मतदारांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप
जयंत जाधव यांनी यावेळी बोलताना दाजी साळकर जाहीरनाम्याव्दारे लोकाची दिशाभूल करीत असल्याची टीका केली. त्यांच्या जाहीरनाम्यात आमदारांनी केलेली तसेच मंजूर झालेल्या कामांचा समावेश असून लोकांनी त्यांच्या प्रचाराला बळी पडू नये. साळकर नाहक श्रेय उपटू पाहात आहेत असे सांगून जाधव यांनी कोरोना काळात आमदारांनी केलेल्या कामांची माहिती दिली. पालिका निवडणुकीत त्यांचे बारा उमेदवार निवडून येतील असा दावा जाधव यांनी केला. संदीप नार्वेकर यांनीही दाजी साळकर यांच्यावर टीका करून मतदार योग्य उमेदवारच निवडतील असा विश्वास व्यक्त केला. सुप्रीया नाईक यांनी पालिका निवडणुकीत पाच महिलांना संधी देऊन त्यांच्या विजयासाठी झटत असल्याबद्दल आमदार कार्लुस आल्मेदा यांचे आभार मानले. युवा गट अध्यक्ष गौरीष नाईक यांनी तिघा युवा कार्यकर्त्यांना आमदार आल्मेदा यांनी पालिका निवडणुक लढवण्याची संधी दिली तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेत असल्याबद्दल त्यांनीही आमदारांचे आभार मानले. यावेळी जयंत जाधव यांनी सुचिता शिरोडकर या प्रभाग क्र. 10 च्या भाजपा पॅनलच्या अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले.
व्यवहार पूर्ण कायदेशीर, मात्र चौकशी व्हावीच- दाजी साळकर दरम्यान, दाजी साळकर यांनी वास्कोचे आमदार व त्यांच्या पदाधिकाऱयांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. पालिका निवडणुकीत अपयशाची चिन्हे दिसू लागल्याने आता त्यांच्यात वैफल्यग्रस्तता दिसून येत आहे. सावरण्यासाठी ते धडपड करीत आहेत. आपला जाहीरनामा सच्चा असून आपण कोणाचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट आमदारांचे अपयश वास्कोतील जनतेला स्पष्टच दिसत आहे. त्यांच्या जमीनीबाबतच्या आरोपातही कोणतेही तथ्य नाही. पालिका निवडणुकीच्या आधल्या दिवशीच अशा प्रकारचे आरोप कुठून व कसे आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 2007 मध्ये जर आपण एखादा घोटाळा केलेला असेल तर गेली नऊ वर्षे सत्तेत असताना आमदारांना चौकशी करावी असे का वाटले नाही. या प्रकाराची त्यांनी योग्य ती चौकशी करावीच असे दाजी साळकर म्हणाले. आपल्या कुटुंबाची जी जमीन हस्तांतरीत करण्यात आलेली आहे, ती सर्व कायदेशीर व्यवहार पूर्ण करूनच व सरकारला आवश्यक असा महसुल फेडूनच करण्यात आलेली आहे असे दाजी साळकर यांनी स्पष्ट केले आहे.