पत्रकार बैठकीत घोषणा : अडीच वर्षात ४२५ कोटींचा निधी : २२५ कोटींची कामे पूर्ण
सांगली /प्रतिनिधी
पुढील विधानसभा निवडणूक मीच लढविणार असे स्पष्ट करत आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुन्हा शड्डू ठोकला आहे. पत्रकार बैठकीत त्यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आमदार गाडगीळ विधानसभा निवडणूक लढणार नाहीत या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. दरम्यान गेल्या अडीच वर्षात मतदार संघात तब्बल ४२५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. पैकी २२५ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. सांगली सिव्हील अत्याधुनिक करण्यावर भर दिला आहे. हरिपूर-कोथळी पूल पावसाळ्यापूर्वी सुरू होईल. आयर्विनला समांतर पुलाचे काम गतीने सुरू असल्याचे आमदार गाडगीळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, सभागृह नेते विनायक शिंहासने, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, जेष्ठ नेते प्रकाश बिरजे, मुन्ना कुरणे, महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती शिंदे, महिला व बाल कल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील आदी उपस्थित होते. ते म्हणाले, मतदार संघात गेल्या अडीच वर्षात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. कोरोना काळात सांगली सिव्हिल हॉस्पिटल सक्षम करण्यावर भर दिला. ९० लाख रुपयांच्या निधीतून ऑक्सिजन प्रकल्प उभा केला आहे. वेळोवेळी व्हेंटिलेटर्स दिले. सिटी स्कॅन मशीनसाठी ८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या शिवाय महालॅब साठी पाठपुरावा सुरू आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल.
हरिपूर-कोथळी पुलाचे बांधकाम अंतीम टप्प्यात आहे. पावाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम गतीने सुरू आहे, असे सांगत गाडगीळ म्हणाले, पेठ – सांगली रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. येत्या चार महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होईल. ओव्हर ब्रिजसाठी २१२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून मतदार संघात तीन ठिकाणी ओव्हर ब्रिज उभारण्यात येणार आहेत. त्यास गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. यापुढच्या काळात उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. शेरीनाला तसेच सांगली शहराच्या पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे ही गाडगीळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.