ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कालच पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज आणखी एका आमदाराने हाती शिवबंधन बांधले आहे. मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले.
गीता जैन या भाजपमध्ये होत्या. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. त्यांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांचा पराभव केला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मागील एक वर्षात भाजप पक्षातील स्थानिक आणि वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी गीता जैन यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे नाराज असलेल्या गीता जैन यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेसाठी ही मोठी जमेची बाजू मानली जात आहे. त्यांच्या प्रवेशानंतर आता मिरा भाईंदर 145 आणि 146 या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे आमदार झाले आहेत. जैन यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला लगेचच आणखी एक धक्का बसला आहे.