प्रतिनिधी / आटपाडी
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी त्याचे सहकारी पॉझिटिव्ह आले होते. अधिवेशनासाठी म्हणून आमदार पडळकर हे मुंबईला गेले असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, खानापूर मतदार संघातील 2 आमदार, 1 माजी आमदार, माजी जि.प.सदस्य अशी नेते मंडळी पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा फैलाव चिंताजनक बनला आहे.
आटपाडी तालुक्यातील कोरोनाचा समूह संसर्ग त्रासदायक ठरत असून तालुक्यातील बधितांची संख्या 700च्या घरात आहे. डॉक्टर, पोलीस, शासकीय कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आले आहेत. आता तालुक्यातील व मतदारसंघातील नेते देखील पॉझिटिव्ह आले आहे. आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, शिवसेना नेते तानाजी पाटील हे यापूर्वीच पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 2 दिवसापूर्वी ते अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मुंबईला तयारीने गेले होते. त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने चिंतेत वाढ झाली असून सांगली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह आमदारांच्या संख्येतही वाढ झाली.