वार्ताहर / कबनूर
आमदार गोपीचंद पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी कबनूर येथील शेतात औत हाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. तसेच आपण शेतकरी कुटूंबातील आहोत. शेतीकाम हे आपल्याला नवीन नाही याची प्रचीती दिली.
आमदार पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे केंद्रीय कृषी विधेयकाच्या समर्थनात किसान आत्मनिर्धार यात्रेनिमित्त गुरुवार ता.२४ रोजी चंदूर (ता हातकणंगले) येथे सभेसाठी रात्री उशिरा आले होते. सभा झाल्यानंतर ते कबनूर येथे शिवनंदी सांस्कृतिक भवनमध्ये त्यांचा मुक्काम होते. सकाळी ते कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रेसाठी निघाले असताना भवना लगतच असलेल्या शेतामध्ये शेतकरी अनिल माळी हे शेतामध्ये औत हाकत होते.
गोपीचंद पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी शेतकरी स्वतः औत ओढत असल्याचे पाहून त्यांना मोह आवरता आला नाही खुद्द पडळकर व खोत यांनी पुढे जाऊन त्या शेतकऱ्यांच्या हातातील ओत आपण हातात घेऊन सुमारे अर्धा तास औत हाकण्याचे काम केले. आपणही शेतकरी कुटूंबातील आहोत याची प्रचीती दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे,बी. डी. सुधीर पाटील, अनिल डाळ्या, हिंमत जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.