प्रतिनिधी /बेळगाव
चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी रस्त्यावरच आंदोलन छेडणाऱया आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे वेगळेच रूप खानापूरवासियांना पहावयास मिळाले. खानापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्भवतींना लस देण्याची सुरुवात सोमवारी झाली. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे केवळ उद्घाटन करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी स्वतः गर्भवतींना लस दिली. आमदार निंबाळकर या स्वतः स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यामुळे लस दिल्यानंतर त्यांनी त्या महिलांची संपूर्ण माहिती घेतली. शिवाय त्यांची स्वतः तपासणी केली.
या काळात त्यांनी कोणता आहार घ्यावा, आपले स्वास्थ्य कसे सांभाळावे, याबाबत माहिती दिली. प्रसूति विभागात जाऊन त्यांनी शिशूंच्या मातांशी संवाद साधला. बाळांना कसे सांभाळावे, त्यांच्यासाठी कोणत्या वयात कोणत्या लसी द्याव्यात, याबाबतही माहिती दिली.