वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातच्या राजकोट जिल्हय़ात काँग्रेसने स्वतःच्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. परंतु या रिसॉर्टच्या मालकाच्या विरोधात टाळेबंदीचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. 65 पैकी बहुतांश आमदारांना विविध रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले आहे. राज्यात 4 जागांवर होणाऱया राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदार भाजपच्या गोटात दाखल होऊ नयेत याकरता काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे.
पोलिसांनी रविवारी राजकोटच्या नीलसिटी रिसॉर्टचे मालक तसेच व्यवस्थापनाच्या विरोधात टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत काँग्रेस आमदारांसाठी रिसॉर्ट सुरू केल्याचा आरोप ठेवला आहे. नियमानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंट सोमवारपासून सुरू करण्यास मुभा आहे.
3 आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने स्वतःच्या बहुतांश आमदारांना राजकोट, बनासकांठा येथील अंबाजी तसेच आणंदमधील रिजॉर्टमध्ये ठेवले आहे. गुजरातच्या 182 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसकडे आता 65 आमदार आहेत. राज्यसभेच्या 4 जागांसाठी गुजरातमध्ये 19 जून रोजी निवडणूक होणार आहे.