संदेश पारकर यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू
- जिल्हय़ात आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज
- 249 रुग्ण कोरोनामुक्त
- जिल्हय़ात रुग्णसंख्या 307 वर तर सक्रिय 52 रुग्ण
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
‘कोरोना’बाधित झालेल्या शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात दोनशेहून अधिक व्यक्ती आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर संदेश पारकर यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे. जिल्हय़ातील आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 249 रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाले असून 52 सक्रिय रुग्ण राहिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
शिवसेना आमदार वैभव नाईक यांना ‘कोरोना’ची लागण झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यांच्या संपर्कात आलेले शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते हादरले होते. सुदैवाने काही ठराविक व्यक्ती सोडल्या तर बहुतेक निगेटिव्ह आले. तसेच प्रशासकीय अधिकारीसुद्धा निगेटिव्ह आल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, आमदार नाईक यांचा जनसंपर्क मोठा असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन स्वॅब तपासणी सुरू आहे. 200 पेक्षा अधिक व्यक्ती आमदार नाईक यांच्या संपर्कात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संपर्कातील अजूनही काही व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनाही ‘कोरोना’ची बाधा झाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
जिल्हय़ात आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण 307 ‘कोरोना’ रुग्णांपैकी 249 रुग्ण बरे झाले आहेत. सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईत गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आता 52 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-सराफदारवाडीत आणि मालवण तालुक्यातील कुणकवळे-टेंबवाडी येथे 100 मीटरचा परिसर, तर हुमरमळा येथील राणेवाडी येथे 500 मीटरचा परिसर, सावंतवाडी तालुक्यातील बांदा-निमजगा कार्यक्षेत्राच्या हद्दीत व दोडामार्ग तालुक्यातील कुडासे-देवमळा येथील सरस्वती विद्यामंदिर येथे 300 मीटर परिसरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
या झोनमध्ये 6 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रात नागरिकांना व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इत्यादींना लागू असणार नाहीत, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर व सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 5140
अहवाल प्राप्त झालेले नमुने 5012
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 307
निगेटिव्ह आलेले नमुने 4705
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 128
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 52
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 249
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 89
शुक्रवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4501
संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 16454
शासकीय संस्थांमधील विलगीकरणातील व्यक्ती 54
गाव पातळीवरील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 13193
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 3207
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 147808
संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी!
वार्ताहर / कणकवली:
जिल्हय़ात विकासकामासंदर्भातील दौऱयाच्या अनुषंगाने फिरत असताना माझा अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आला असला, तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाईन व्हावे. गरज वाटल्यास आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार स्वॅब तपासणी करून घ्यावी. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले आहे. गुरुवारी पारकर यांचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आमदार वैभव नाईक यांच्यासोबत पारकर दौऱयात सहभागी झाले होते. आमदार नाईक यांचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पारकर यांनी बुधवारी स्वॅब तपासणीसाठी दिला होता, तो गुरुवारी पॉझिटिव्ह आला.