कोल्हापूर/प्रतिनिधी
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी राणे समर्थकांसह पोलिसांची मोठी गर्दी झाली होती.
आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाले आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखणे वाढल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला. कणकवलीहून पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सायंकाळी साडेचार वाजता वाहनांचा ताफा रुग्णालयात दाखल झाला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रुग्णवाहिकेतून उतरल्यानंतर आमदार राणे थेट प्राथमिक उपचार केंद्र येथे दाखल झाले. याठिकाणी डॉक्टरांचा मोठा ताफा उपस्थित होता. राणे यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू करण्यात आली आहे.