वार्ताहर/ मडकई
भाजपाने यापुढे अन्य कुठल्याही पक्षाचे आमदार फोडू नयेत, या एकाच अटीवर सरकारला पाठिंबा देण्याचे आपण जाहीर केले आहे. भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या केंदीय नेत्यांना फोनवरुन तसे कळविले आहे. लोकशाही बळकट होण्यासाठी फोडाफोडीचे हे राजकारण कायमचे बंद झाले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. तसे झाल्यास गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांना हीच खरी आदरांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.
स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त मगो पक्षातर्फे फर्मागुडी येथील भाऊसाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ढवळीकर बोलत होते. राज्यातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी मगो पक्षातर्फे एक मसुदा तयार केला आहे. जे आमदार पक्षांतर करतील, त्यांना किमान सहा वर्षे निवडणुक लढविण्यास निर्बंध घातले जावेत. ग्रामपातळीवरच्या राजकाराणातही या मसुदा लागू झाला पाहिजे. हा कायदा अस्तित्त्वात आल्यास लोकशाही खऱया अर्थाने सक्षम होईल. त्यासाठी मगो पक्षातर्फे भारताचे निवडणूक आयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी येत्या दहा दिवसांत तसा पत्रव्यवहार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, केंद्रीय समितीचे कार्याध्यक्ष प्रताप फडते, खजीनदार अनंत नाईक, अनिल नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, मडकईचे युवा नेते मिथील ढवळीकर, संकेत मुळे, तळावलीचे सरपंच दिलेश गावंकर, पंचसदस्य भारती नाईक, महादेव नाईक, बांदोडाचे सरपंच राजेश नाईक, उपसरपंच सलोनी गावडे, पंचसदस्य साईशा नाईक, वामन नाईक, वेलिंग प्रियोळचे माजी उपसरपंच पांडुरंग गावडे, आडपई दुर्भाटच्या सरपंच सरोज नाईक, मडकईचे उपसरपंच विशांत नाईक, दीपा नाइं&क, मनुजा नाईक, सोनाली तेंडुलकर, मनोज बोरकर, मशाल आडपईकर, कुंडईचे पंचसदस्य लक्षी जोशी, कार्यकर्ते जानू नाईक, दिगंबर नाइं&क, विशाल दुर्भाटकर, जयंकात तारी, अतुल नाईक, सर्वेश तळावलीकर आदी उपस्थित होते.