प्रतिनिधी/ कराड
कोल्हापूर जिल्हय़ातील करवीरचे विद्यमान आमदार व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा राजेश व मुलगी सौ. टीना यांच्यावर जाचहाट, मारहाण, फसवणूक प्रकरणी कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूनेला शिवीगाळ करून मारहाण करत 1 कोटीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद असून यावरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबतची फिर्याद सौ. आदिती राजेश पाटील (वय 32, रा. भारत हाऊसिंग सोसायटी, राजारामपुरी 8 वी गल्ली, कोल्हापूर, सध्या रा. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील (रा. कोल्हापूर), पती राजेश पांडुरंग पाटील (रा. कोल्हापूर) व नणंद सौ. टीना महेश पाटील (रा. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
सौ. आदिती राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, सौ. अदिती व राजेश यांचा विवाह 29 जानेवारी 2017 कोल्हापूर येथे झाला होता. मात्र विवाह ठरविताना सासरे पी. एन. पाटील, नणंद टीना पाटील यांनी जाणीवपूर्वक पती राजेश यांच्याबद्दल खोटी माहिती दिली. व्यसन तसेच आजाराबाबत माहिती लपवली. पती राजेश हे व्यसनाधीन असताना यास मीच जबाबदार, असे खोटे आरोप करून त्यांना अपमानित करण्यात आले.
आदिती यांच्या विवाहानंतर काही काळाने त्यांना सासरच्या लोकांकडून त्रास सुरू झाला. राजेश सध्या श्रीपतराव बोंद्रे पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. वास्तविक राजेश यांना असलेला आजार लपवून त्यांच्याशी विवाह झाल्याचे आदिती यांना लग्नग्नानंतर कळाले. आदिती यांना सासरच्या लोकांनी सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिली आहे. लग्नानंतर पती राजेश यांनी सातत्याने शिवीगाळ करून मारहाण केली आहे. मोठय़ा वाहनांसह घर घेण्यासाठी माहेरून एक कोटी रूपये आणण्यासाठी आदीतीला त्रास दिला. त्यांची मागणी करून ती पूर्ण न केल्याने प्रसंगी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आदिती यांच्या फिर्यादीत पती, सासरे व नणंद यांनी संगनमत करुन विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे आदी 498 अ, 417, 323, 504, 506, 34 या कलमांन्वये संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली फौजदार अर्जुन चोरगे तपास करत आहेत. सध्या अदिती पाटील या आपले वडील सुभाषराव पांडुरंग पाटील (रा. वाखाण रोड, कराड) या ठिकाणी वास्तव्यास आहेत.