प्रतिनिधी / सोलापूर
आ. प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश न होण्यामागे केवळ आणि केवळ मल्लिकार्जून खर्गे यांचा हात आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी ‘खर्गे हटाव काँग्रेस बचाव’चा नारा देत खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे चार हुतात्मा पुतळा चौक येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात आ. प्रणिती शिंदे यांना स्थान मिळाले नाही. याला खर्गे जबाबदार आहेत. यामुळे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी, राहूल गांधी जिंदाबाद, काँग्रेस पक्षाचा विजय असो असे म्हणत खर्गे हटाव काँग्रेस बचाव अशा घोषणा दिल्या.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश युवक सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, राजासाब शेख, संतोष अट्टेलूर, विवेक इंगळे, प्रवीण जाधव, राहुल गोयल, शाहू सलगर, यल्लप्पा तुपदोळकर, सुभाष वाघमारे, विवेक कन्ना, सैफन शेख, आप्पाजी गायकवाड, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.