प्रतिनिधी /फोंडा
फोंडयाचे कॉग्रसचे आमदार रवी नाईक व निष्ठावंत कॉग्रेस कार्यकत्यातर्फे दिवंगत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची 77 वी जयंती काल शुक्रवारी साजरी करण्यात आली. खडपाबांध-फोंडा येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेवक आनंद नाईक, हल्लीच बरखास्त करण्यात आलेल्या फोंडा गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष अरुण गुडेकर, शब्बीर शेख, आचल वेरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्व. राजीव गांधी हे सतत हसतमुख व देशाला लाभलेले सर्वात तरूण पंतप्रधान होते. देशभर त्यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. राजीव गांधी दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी देशातील मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षांवर आणण्यात महत्वाचे योगदान दिलेले आहे. राजीव गांधी यांच्या शेवटच्या गोवा भेटीवेळी आपण मुख्यमंत्रीपदी होतो, राजीव गांधी आझाद मैदान येथे सभा उरकल्यानंतर मध्यप्रदेशमार्गे मद्रास येथे दाखल झाले होते. त्याच्या अकाली निधनामुळे अनेक स्वप्न अधुरे राहिली व देश एका आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची पाया रचणाऱया तरूण पंतप्रधानाला मुकल्याचे रवी नाईक यावेळी बोलताना म्हणाले. अरुण गुडेकर यांनी स्वागत केले. आचल वेरेकर यांनी आभार मानले.