कोल्हापूर : प्रतिनिधी,
जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत विरोधी आघाडी समवेत येण्यासाठी आमदार राजशे पाटील यांच्यासाठी विरोधी आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी दुसऱ्या दिवशीही आमदार पाटील यांची भेट घेवून विरोधी आघाडीच्या नेत्यांनी चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर आमदार पाटील यांनी विरोधी शाहू आघाडी समवेत राहाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
माजी आमदार सत्यजित पाटील विरोधी आघाडीतून परत सत्तारुढ गटात गेले आहेत. त्यामुळे आघाडी भक्कम राहाण्यासाठी विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सावध भुमिका घेतली आहे. परिणामी विद्यमान संचालक व आमदार राजेश पाटील यांना सलग दुसऱ्या दिवशी भेटून मन वळविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सायंकाळी ७ वाजता मंत्री मुश्रीफ यांनी शासकीय विश्राम गृह येथे आमदार पाटील यांच्याशी सविस्त चर्चा केली. सुमारे दिड तास ही चर्चा सुरू होती. या दरम्यान विरोधी आघाडीचे सर्व नेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे बसून होते. मंत्री मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आमदार पाटील मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत मेडिकल कॉलेज येथील बैठकीला गेले. या ठिकाणीही बराचवेळ चर्चा झाली. आमदार पाटील आपल्या समवेत तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना घेवून या बैठकीला उपस्थित राहिले होते.
मी राष्ट्रवादीचा आमदार असल्याने मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत व विरोधी शाहू आघाडी समवेत असणार असल्याचे सांगत विरोधी आघाडीला जाहिर पाठींबा दिला. असल्याचे समजते.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यासह खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, के पी. पाटील, बाबासाहेब चौगले, ए वाय पाटील यांच्यासह आमदार राजेश पाटील यांचे कार्यकर्तेही मोठया संख्येने उपस्थित होते.
‘दौलत’ हाच चर्चेचा मुद्दा.!
खरेतर गोपाळराव पाटील विरोधी आघाडीत आल्यामुळेच आमदार राजेश पाटील यांच्या विरोधी आघाडीतील प्रवेशाला अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच जिल्हा बँकेतील संचालक पद मिळण्यास झालेल्या उशिर अशा अनेक विषयांवरती आमदार पाटील यांनी स्पष्ट शब्दात मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत झालेल्या बैठकीत चर्चा केली असल्याचे समजते.