प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात भाजपचे सेवा कार्य सुरू आहे. विधान परिषद आमदार प्रसाद लाड हे मुंबई निवासी असून मुंबईमध्ये त्यांचे मोठे काम सुरू आहे. असे असूनही रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी त्यांच्याकडून अन्नधान्य, पीपीई किट, मास्क व सॅनिटायझर स्वरुपात भरीव मदत देण्यात आली.
गुरुवारी प्रसाद लाड यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हय़ातील परिस्थितीची, मदत कार्याची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱयांकडे आपल्या आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा विशेष निधी सुपुर्द करण्याबाबतचे पत्र दिले.
या निधीतून आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांना आरोग्य साहित्यासाठी पाच लाख व पोलीस कर्मचारी यांच्यासाठीच्या आरोग्यविषयक साहित्य खरेदीसाठी पाच लाख असे खर्च करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांना दिल्या. पोलीस कर्मचारी यांच्यासाठी 50 पीपीई किट पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे सुपुर्द केले. अजूनही आवश्यक आरोग्य साहित्य लागल्यास ते पुरविण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते.