सरकारी कर्मचाऱयांच्या कामात आणला व्यत्यय
प्रतिनिधी /मडगाव
दामोदर लिंग फातोर्डा येथे रस्ता अडवून सुरळीत वाहतुकीस अडथळा निर्माण करुन डय़ुटीवरील पोलीस कर्मचाऱयांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरुन फातोर्डा पोलिसांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व इतरांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
भारतीय दंड संहितेच्या 143, 341, 353 कलमाखाली हा गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा मतदारसंघातील आमदार सरदेसाई याच्याशिवाय दुर्गादास कामत, सिद्धनाथ बुयांव, दिलीप प्रभुदेसाई, मोहनदास लोलयेकर, कादर शहा, अश्मा शेख व इतर 100 अज्ञात संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
30 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.20 ते 11.50 या दरम्यान ही घटना घडली. फातोर्डा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश गावकर यांनी या प्रकरणी पोलीस तक्रार केलेली आहे.
फातोर्डा मतदारसंघात विकास घडवून आण्ण्यासाठी सरकारने काही कामे मंजूर केली होती. मात्र प्रत्यक्षात ही कामे होत नसल्याचे आढळून आल्यानंतर वरील संशयितानी वरील जागी बेकायदेशीर जमाव केला आणि सुरळीत वाहतूक अडवून धरली. तक्रारीनुसार डय़टीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केला आणि याच कारणास्तव आमदाराविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.