जिल्हय़ात आणखी तेरा पॉझिटिव्ह : ‘लाईफ टाईम’मध्ये कोरोनाचा शिरकाव, डॉक्टर पॉझिटिव्ह : पारकर कुटुंबातील चौघांवर घरीच उपचार
- जिल्हय़ात कोरोनाची झपाटय़ाने वाढ
- कोरोना बाधित रुग्णांची संख्या 347 वर
- 259 रुग्णांना डिस्चार्ज, 81 रुग्ण सक्रीय
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
आमदार वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली असून आठव्या दिवशी सोमवारी त्यांना व त्यांच्या 15 वर्षीय मुलीला जिल्हा रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त करीत आपण प्लाझ्मा थेरपी देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान जिल्हय़ात आणखी तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 342 वर पोहोचली आहे. तर संदेश पारकर यांच्या कुटुंबातील चौघांना घरामध्येच आयसोलेशन करून उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. पडवे येथील ‘लाईफ टाईम’ हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्या ठिकाणी कंटेनमेंट झोनही जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
आमदार नाईक यांना 20 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हय़ात खळबळ उडाली होती. ते प्रशासकीय बैठकांनाही उपस्थित राहिल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व शिवसेना पदाधिकारी हादरले होते. सुदैवाने सर्व प्रशासकीय अधिकाऱयांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. तसेच बहुतांश शिवसेना पदाधिकाऱयांचेही अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र वैभव नाईक यांची 15 वर्षीय मुलगी, एक चुलत भाऊ आणि खासगी स्विय सहाय्यक यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड-19 सेंटरमध्ये उपचार सुरु होते. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आमदार नाईक आणि त्यांच्या मुलीची प्रकृती उत्तम असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी सोमवारी या दोघांनाही डिस्चार्ज दिला.
डिस्चार्जनंतर बोलताना आमदार नाईक यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱयांनी आपली उत्तम प्रकारे आरोग्य सेवा केली. केवळ आमदार म्हणूनच नाही, तर इतर सर्वसामान्य रुग्णांचीही ते चांगल्या प्रकारे काळजी घेत असल्याचे आपल्याला दिसून आले, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण आता कोरोनावर मात केल्याने प्लाझ्मा थेरेपी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
जिल्हय़ात आणखी 13 पॉझिटिव्ह रुग्ण
रविवारी रात्री उशिरा कणकवली तालुक्यातील कलमठ येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी चौघेजण पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील बांदा, इन्सुली आणि मळगाव या ठिकाणचा प्रत्येकी एक रुग्ण, तर पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविडची तपासणी केलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. त्याचा गाव समजू शकला नाही. त्यानंतर सायंकाळी पुन्हा आठजण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये कणकवली तालुक्यातील कणकवली शहरातील चार, जानवली – तीन, तर सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी शहरातील एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभरात तेरा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून जिल्हय़ात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 347 झाली आहे. तसेच सोमवारी आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज दिल्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 259 झाली आहे. पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत कोरोना सक्रिय रुग्ण 81 आहेत.
पारकर कुटुंबातील चौघे घरीच आयसोलेशनमध्ये
शिवसेना नेते संदेश पारकर हेही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर त्यांचा मुलगा, मुलगी, पुतण्या आणि एक नातेवाईकही पॉझिटिव्ह आला होता. या चौघांना पारकर यांच्या कणकवली येथील घरामध्येच आयसोलेशन करून उपचाराखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
जिल्हय़ात 31 ठिकाणी कंटेनमेंट झोन
जिल्हय़ामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत एकूण 150 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. मात्र कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने 119 कंटेनमेंट झोन शिथील करण्यात आले असून सद्यस्थितीत 31 ठिकाणी कंटेनमेंट झोन सक्रिय आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील 11, कुडाळ तालुक्यातील आठ, सावंतवाडी तालुक्यातील सहा, देवगड तालुक्यातील दोन, मालवण तालुक्यातील दोन, वेंगुर्ले तालुक्यातील एक व दोडामार्ग तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
कुडाळ तालुक्मयात कंटेनमेंट झोन
कुडाळ येथील कुडाळेश्वरवाडी, अर्थव प्लाझा कुडाळ हे केंद्र मानून अर्थव प्लाझा कुडाळपासून 50 मीटर क्षेत्राच्या हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच पडवे येथील एस. एस. पी. एम. वैद्यकीय महाविद्यालय पडवे वैद्यकीय वसाहतीपासून 100 मीटर क्षेत्राच्या हद्दीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कणकवली तालुक्मयात वागदे, जानवली येथे कंटेनमेंट झोन
कणकवली येथील वागदे-सावरवाडी येथील साईपार्क अपार्टमेंट, 11 फ्लॅट, 11 कुटुंबे व 36 लोकसंख्येचा 50 मीटरचा परिसर, तर जानवली येथील एक घर, एक कुटुंब व चार लोकसंख्येचा समावेश असणारा 50 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वरील सर्व कंटेनमेंट झोनमध्ये 8 ऑगस्ट रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 5608
अहवाल प्राप्त झालेले नमुने 5529
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 347
निगेटिव्ह आलेले नमुने 5195
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 79
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 81
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 259
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 114
सोमवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 3154
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 16689
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 66
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13315
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3308
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 153480
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 31
आयसोलेशन वॉर्डला जिल्हाधिकाऱयांची भेट
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड – 19 आयसोलेशन वॉर्डला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. यावेळी आयएमएचे डॉ. संजय केसरे, ‘डब्ल्यूएचओ’चे कन्स्लटंट डॉ. तेजपाल सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. नागेश पवार, डॉ. गावकर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रुग्णांना मिळत असलेल्या सोयी व सुविधांविषयी विचारपूस केली. कोविड-19 वॉर्डमध्ये मिळत असलेल्या औषधोपचारांविषयी रुग्णांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांनी आयसीयू वॉर्डलाही भेट दिली. सर्व प्रक्रियांची माहिती घेतली. ऑक्सिजनचा होत असणारा पुरवठा, व्हेंटिलेटर, मॉनिटर यांचीही पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी कोविड-19 वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या सूचनाही केल्या.