आनेवाडी टोलनाका आंदोलन : पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी
प्रतिनिधी/ वाई
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दूरवस्था झालेली असताना आणि आवश्यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत असल्या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रिलायन्स इन्फ्रा यांच्याविरोधात टोल विरोधी घोषणा देत टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करत निदर्शने केल्याच्या कारणावरून दाखल गुह्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 17 जणांना शुक्रवारी वाई न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.
दि 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्यावर सातारा बाजूकडून विरमाडे (ता. वाई) गावाकडे टोलनाक्याचे लेन क्रमांक एकच्या बाजुच्या कठडय़ावर आमदार शिवेंद्रराजे भोसले व त्यांचे समर्थक फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र उर्फ जयंत दादा चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते आणि 80 लोकांनी टोलनाक्यावर टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करत, टोलनाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली.
त्यावेळी जिल्हाधिकाऱयांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला. म्हणून पोलीस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. याकामी सुनावणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतरांवर वेळोवेळी समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. शुक्रवारी आमदार शिवेंद्रराजे भोसले व सर्व संशयित 17 जण न्यायालयात उपस्थित राहिले.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पाच हजाराच्या जातमूचलक्यावर शिवेंद्रराजेंना न्यायालयाने जमीन मंजूर केला. शिवेंद्रसिंह व इतरांच्यावतीने ऍड. शिवराज धनवडे, ऍड. आर. डी. साळुंखे, ऍड. संग्राम मुंडेकर, ऍड. प्रसाद जोशी यांनी, तर सरकार पक्षाच्यावतीने ऍड. मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.