प्रतिनिधी/ सातारा
पुणे जिह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करुन त्यांना ’हनी ट्रॅप’मध्ये गोवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) असे अटक झालेल्याचे नाव असून अजून दोघेजण पसार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आमदारांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करण्याचा हा प्रकार शुक्रवारी समोर आला होता. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करुन त्यांना ’हनी ट्रॅप’मध्ये अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा डाव शैलेश शिवाजी मोहिते-पाटील, राहूल किसन कांडगे, सोमनाथ दिलीप शेडगे या तिघांनी एका युवतीच्या मदतीने आखला होता.
मात्र, संबंधित युवतीनेच या प्रकाराची माहिती आमदारांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांना दिली होती. यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. पोलीस या संशयितांचा शोध घेत होते. यापैकी सोमनाथ शेडगे याला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, यातील संशयित शैलेश मोहिते-पाटील आमदारांचा दूरचा नातेवाईक असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.