सांगरूळ / वार्ताहर
ऊस तोडणीसाठी बाहेरगावी जात असताना ऊसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला आमशी बोलोली रस्त्यादरम्यान ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दुर्गुळेवाडी ( ता करवीर )येथील दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. गणेश शामराव पाटील ( वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश पाटील याचे वडील ऊसतोड कामगार आहेत. वाकरे येथे ऊसतोडणीचे काम सुरू असल्याने शेतातील अनेक कामे खोळंबली होती. त्यामुळे गणेश याला शनिवारी आपल्या बदली पाठवून शेतातील कामे आटोपण्यासाठी त्याचे वडील घरी आले होते. गणेश हा शनिवारी सकाळी वडिलांच्या बदली ऊस तोडणीसाठी वाकरे येथे मोटारसायकलवरून निघाला होता. आमशी गावानजीक ऊस घेऊन साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्यासाठी त्याने गाडी रस्त्यावरून साईडपट्टी वरती घेतली पण साईडपट्टीवरून पुन्हा दुचाकी रस्त्यावरती घेताना घसरली आणि तो मोटरसायकलसोबत रस्त्यावरून फरफटत गेला.
डांबरी रस्त्यावर जोरात डोकं आदळल्याने शिवाय काही अंतर फरफटत गेल्याने गंभीर जखमी झालेल्या गणेशचा जागीच मृत्यू झाला. करवीर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या पश्चात आई वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.